धामणगाव तालुक्यातील ३० हजार ग्रामस्थ लसीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:35+5:302021-04-10T04:12:35+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे शासनाने घोषित केले असले तरी शहर व तालुक्यातील ३० ...

धामणगाव तालुक्यातील ३० हजार ग्रामस्थ लसीच्या प्रतीक्षेत
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे शासनाने घोषित केले असले तरी शहर व तालुक्यातील ३० हजार ग्रामस्थ आजही लसीपासून वंचित आहेत. दरम्यान पाच केंद्रांवरील लसीकरण बंद करण्यात आले. लसीकरण केंद्रांबाहेर लस उपलब्ध नसल्याचे फलक लावल्यामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांना घराकडे परतावे लागले.
धामणगाव तालुक्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ३० हजार लस हव्या आहेत. पैकी ६,८०० जणांना लस देण्यात आली, तर २३,२०० ग्रामस्थ लसीपासून वंचित आहेत. अंजनसिंगी, निंबोली, तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर या केंद्रावर लसीकरण बंद केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी सांगितले. धामणगाव शहरात ४,२०० जणांना लस देण्यात आली. शहरात आजही आठ हजारांच्या जवळपास नागरिक लसीपासून वंचित आहे. तालुक्यातील एक हजाराच्या वर ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली. आताही दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. ४५ वर्षांवरील रक्तदाब, मधुमेह व अति गंभीर आजाराचे रुग्ण अधिक आहे. त्यांना लस मिळणे अपेक्षित आहे. शहरात लसीचा साठा उपलब्ध होताच लस देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी दिली.