३० टक्के नागरिक बुरशी संसर्गाने बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:09 IST2017-08-10T00:08:27+5:302017-08-10T00:09:53+5:30
अलिकडे बुरशी संसर्गाचा आजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

३० टक्के नागरिक बुरशी संसर्गाने बेजार
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अलिकडे बुरशी संसर्गाचा आजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हा त्वचेवरील जखमा, अनारोग्य, ओलसरपणा याकारणामुळे होणारा आजार असून त्वचा, जांघा, पाऊल, नखे, टाळू, तोंड या शरीराच्या भागात होणारा हा आजार असून पावसाळ्यात याआजाराचे सर्वाधिक रूग्ण आढळून येतात. सद्यस्थितीत लोकसंख्येच्या ३० ते ४० टक्के लोकांना या आजाराने ग्रासले आहे. त्वरीत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याचे मत त्वाचारोगतज्ज्ञ सुनील साकरकर यांनी व्यक्त केले.
हा आजार अनेकांना असतो. पण, अनेकजण तो लपवून ठेवतात किंवा डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे विविध प्रकारचे त्वचारोग होण्याची शक्यता असते.
दमट वातावरण, मधुमेह, शारीरिक दुर्बलता, तंग कपडे घालणे यामुळे सुद्धा अनेकदा बुरशी संसर्गाचा आजार बळावतो. हा आजार झाल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार न घेता परस्पर मेडिकलमधून चुकीच्या औषधी घेतल्या जातात. यामुळे हा आजार कमी होण्याऐवजी अधिकच पसरतो. त्यामुळे रूग्णांनी परस्पर औषधी घेणे टाळावे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. योग्य उपचारानेच हा आजार बरा होतो.
आजाराबाबत अनेक गैरसमज
बुरशी संसर्गाबाबत अनेक गैरसमज आहेत. जसे एकदा उपचार घेतल्यास हा आजार कायमचा जातो, बुरशी संसर्ग बाधितांच्या वस्तू वापरण्यास चालतात, गुप्त अवयवांमधील बुरशी संसर्ग टाळण्यासाठी सुगंधी उत्पादने चांगली असतात, नखांमधील संसर्ग बरा होत नाही, पाय नियमित धुतल्यास अॅथेलेट्स फूट (पावलांचा संसर्ग) टाळता येऊ शकतो. अशा एक ना अनेक गैरसमजांमुळे हा आजार बळावतो.
तथ्य काय ?
मध्येच उपचार सोडल्यास बुरशी संसर्ग पुन्हा निर्माण होऊ शकतो, बुरशी संसर्ग पसरण्याची भीती असल्याने दुसºयांच्या वैयक्तिक वस्तू वापरू नका, सुगंधी साबण, हायजीन वॉश यांचा वापर करू नका. गुप्त अवयव साध्या पाण्याने धुणे योग्य, अवयव कोरडे ठेवल्याने बुरशी संसर्ग टाळता येऊ शकतो. योग्य उपचार केल्यास नखांचा संसर्ग बरा होऊ शकतो. धुतल्याने बुरशी नष्ट होत नाही. पण, पाय स्वच्छ व कोरडे ठेवल्यास रोग टाळण्यास मदत होऊ शकते.
एकूण लोकसंख्येच्या ३० ते ४० टक्के नागरिकांना बुरशी संसर्गाचा आजार असतो. हा आजार न लपविता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्वरित उपचार घेतल्यास आजार बरा होतो.परस्पर औषधी घेणे टाळावे.
- सुनील साकरकर,
त्वचारोगतज्ज्ञ, अमरावती.