अमरावती : संपत्तीचे बनावट दस्तऐवज सादर करून एका फायनान्स कंपनीची ३० लाखांनी फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी गांधी चौक येथील एका बँकेत उघडकीस आला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवून चौकशी आरंभली असून आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी गजानन वसंत कुळकर्णी (४३, रा. बुधवारा) व एक महिला यांचा मे.व्यंकटेश पॅकिंग अॅन्ड इन्व्हलप नावाने व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने ईक्विटा फायनांस लि. या कंपनीकडे संपत्तीचे कागदपत्रे गहाण ठेवून ३० लाखांचे कर्ज काढले. मात्र, आरोपींनी कर्जाचे हप्ते न भरता कंपनीची टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीने त्यांच्या दस्तऐवजांची चौकशी केली असता त्यामध्ये संपत्तीचे दस्तऐवज बनावट असल्याचे निदर्शनास आले. दस्तऐवजावर शासन अधिकाऱ्यांची सही व राजमुद्राचा गैरवापर केल्याचे फायनांस कंपनीच्या लक्षात आले आहे. कंपनीतर्फे सुमित रमेश वानखडे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील जामनेकर यांनी केला. पोलीस आरोपीच्या शोधात त्यांच्या घरी गेले होते. मात्र, आरोपीच्या घराला कुलूप लागल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोपी पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
बनावट दस्तावेजाद्वारे ३० लाखांनी फसवणूक
By admin | Updated: March 13, 2016 00:06 IST