कर्ज, रूपांतरणाला ३० जुलै ‘डेडलाईन’
By Admin | Updated: July 26, 2015 00:36 IST2015-07-26T00:36:56+5:302015-07-26T00:36:56+5:30
उशिरा पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. या आठवड्यात सलग चार दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असताना त्याला बँकेच्या कर्जाची आवश्यकता आहे.

कर्ज, रूपांतरणाला ३० जुलै ‘डेडलाईन’
जिल्हा प्रशासनाची दखल : बँकांचा आखडता हात, शेतकरी अडचणीत
अमरावती : उशिरा पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. या आठवड्यात सलग चार दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असताना त्याला बँकेच्या कर्जाची आवश्यकता आहे. मात्र, जुन्या कर्जाच्या पुनर्गठनाअभावी नव्याने कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेत बाधा येत आहे. जिल्हा बँकेसह काही राष्ट्रीयीकृत बँका टाळाटाळ करीत असल्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व तत्काळ कर्जाचे रुपांतरण व कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप हंगामासाठी १ लाख २० हजार ५६० शेतकऱ्यांना ११२० कोटी ३६ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यापैकी ७० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला आहे. गतवर्षी वाटप झालेल्या पीककर्जापैकी ४५ हजार ८४६ शेतकऱ्यांचे ४०४ कोटी २३ लाख रूपयांच्या कर्ज रुपांतरणास पात्र असताना २४ जुलै अखेर ३९ हजार ९४७ शेतकऱ्यांचे ३४६ कोटी ३० लाख रूपयांच्या कर्जाचे रुपांतरण करण्यात आले आहे. ही टक्केवारीची सरासरी ८६ इतकी आहे.
यंदा २४ जुलैअखेर १ लाख ३१ हजार ७४२ खातेदारांना १२०५ कोटी ६७ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. ही टक्केवारी ७१ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट्यदेखील अधिक असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल.(प्रतिनिधी)