खरिपासाठी ३० कोटींची उलाढाल
By Admin | Updated: May 21, 2016 00:20 IST2016-05-21T00:20:47+5:302016-05-21T00:20:47+5:30
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यानुषंगाने शती मशागत, बी-बियाणे, खते आदी कामे जोमाने सुरू आहेत.

खरिपासाठी ३० कोटींची उलाढाल
खरीप हंगाम : कपाशी, सोयाबीन बियाण्यांवर १६ कोटींचा खर्च
धामणगाव रेल्वे : खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यानुषंगाने शती मशागत, बी-बियाणे, खते आदी कामे जोमाने सुरू आहेत. यावर्षी तालुक्यात ३० कोटी रूपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती आहे.
धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर असून खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे़ या हंगामाच्या जून महिन्यात मोठी उलाढाल होते़ यावर्षी कपाशीचे क्षेत्र घटणार आहे़ २० हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे़ ८०० रूपये किमतीचे बीटी बियाण्याचे पाकीट लागवडीसाठी लागणार असून १ लाख २० हजार पॉकेट १० कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे़ इतर पिकामध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, ३ हजार हेक्टर असून ५० लाख रूपयांसह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते़
सोयाबीनचा पेरा वाढणार असून मागील वर्षी १९ हजार २८० हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली होती़ यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होणार आहे़ ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाण्यावर होईल.़ ७ हजार ८३० हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ७५ लाख रूपयाची ९०० क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे़
तालुक्यात खतासाठी १५ कोटी रूपये खर्च शेतकऱ्यांचा होणार आहे़ दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे़ शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे अवघड झाले आहे़ कपाशी पेऱ्यासाठी सारे पाडणे, सरकी टोपण करणे याकरिता प्रतीहेक्टर ५०० रूपयांच्या अतिरिक्त खर्च येत असून १ कोटी रूपये कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले़
सोयाबीन तूर या बियाण्याचा पेरा करताना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २०० रूपये अतिरिक्त खर्च येतो़ २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होत असून मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींहून अधिक खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो़
तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज मिळत असले तरी या रकमेत बी-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च पूर्ण होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षाकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतात पीक लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम परत केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे़
तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्याप्रमाणे झाला आणि आगामी १० जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीप्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होणार नाही, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान व तालुका कृषी अधिकारी अरूण गजभिये यांनी दिली़ (तालुका प्रतिनिधी)