३० कोटींचा प्रकल्प जाणार १०० कोटींवर
By Admin | Updated: December 6, 2015 00:12 IST2015-12-06T00:12:36+5:302015-12-06T00:12:36+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्न साखळी सिंचन प्रकल्पाची मूळ किंमत ३१ कोटी होती.

३० कोटींचा प्रकल्प जाणार १०० कोटींवर
पाच वर्षांत जाणार पूर्णत्वास : १३ लाख रुपये एकरी मोबदला
मनीष कहाते वाढोणा रामनाथ
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्न साखळी सिंचन प्रकल्पाची मूळ किंमत ३१ कोटी होती. बुडीत क्षेत्रातील जमिनीचे भाव वाढल्याने प्रकल्प १०० कोटींच्या घरात जाणार आहे. वाढीव किंमतीचा फायदा जरी शेतकऱ्यांना होणार असला तरी किमान पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील अर्जुनपूर, अमदापूर आणि हरणी अशा तीन गावांतील २८ शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम करणार आहे. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी जलसंपदा विभागाने सुमारे १२ ते १३ लाख रूपये एकराप्रमाणे केली आहे. जमिनीच्या वाढीव किमतीचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र दुसरीकडे सिंचन प्रकल्पाची किंमत तीनपट वाढली.
दरवर्षी प्रकल्पाच्या बांधकामाकरिता २० कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारण्याकरिता अधिक पाच वर्षे लागतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रत्यक्ष पाणी देण्याकरिता अजून ५-६ वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
१८०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या निम्न साखळी प्रकल्पाची भिंत १९२० मीटर आहे. सध्या निधी कमी असल्याने प्रकल्पाच्या भिंतीकरिता जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. काही प्रमाणात कामही झाले. परंतु भिंतीच्या बांधकामाकरिता काळी माती उपलब्ध झाली नसल्याने गेल्या २-३ महिन्यांपासून प्रकल्पाचे काम रखडले आहे.