२९७ जणांचे तोंड उघडणे बंद; खर्ऱ्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST2021-03-09T04:15:40+5:302021-03-09T04:15:40+5:30
मोहन राऊत धामणगाव रेल्वे : सुपारी, तंबाखू , चुना, थंडाई तसेच इतर पदार्थांपासून तयार केलेला गुटखा म्हणजे खर्रा ...

२९७ जणांचे तोंड उघडणे बंद; खर्ऱ्याचा परिणाम
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : सुपारी, तंबाखू , चुना, थंडाई तसेच इतर पदार्थांपासून तयार केलेला गुटखा म्हणजे खर्रा तरुण पिढीला चटक लावून गेला आहे. याच्या सेवनामुळे पंचवीस ते चाळीस वर्ष वयोगटातील युवक तोंडाच्या कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असून, तालुक्यातील २९७ जणांना तोंडच उघडता येत नसल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
राज्य शासनाने १९ जुलै २०१२ रोजी गुटखाबंदी केली. केरळ, मध्य प्रदेश, बिहारनंतर संपूर्ण राज्यात गुटखाबंदी करणारे महाराष्ट्र हे चौथे ठरले. एक महिन्यात ३० कोटींचा महसूल बुडाला तरी चालेल. तथापि, राज्यातील तरुण पिढी गुटख्याला बळी जाऊ नये म्हणून गुटखाबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, गुटखाबंदीनंतर खर्रा खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धामणगाव तालुक्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, निंबोली परिसरात ६० युवकांचे या खर्ऱ्यामुळे तोंड उघडत नाही. मंगरूळ दस्तगीर परिसरात ७० युवकांना तोंड उघडता येत नसल्याने जेवण करता येत नाही. तळेगाव दशासर भागात ५५ युवक व्यवस्थितपणे काही खाऊ शकत नाही. अंजनसिंगी परिसरातील सर्वांत भयावह स्थिती आहे. तेथे ११४ जणांचे तोंड खर्ऱ्यामुळे बंद झाले आहे.
सहा हजार खातात तंबाखू अन सुपारी
तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल सहा हजार लोक तंबाखू व सुपारी दिवसातून १२ ते १३ वेळा चघळत असल्याचे सर्वेक्षणात पाहायला मिळते. तंबाखूचे सेवन अधिक प्रमाणात होत असल्याने निकोटिन हा घटक शरीरावर सर्वाधिक वाईट परिणाम करीत आहे. तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे, पचनशक्ती कमी होणे, अंडाशयावर परिणाम होऊन शुक्राणूची संख्या कमी होणे, नपुंसकत्व येणे अशा अनेक तक्रारींमध्ये वाढ झाली. कर्करोगालाही खर्ऱ्याने आमंत्रण मिळत आहे.
शासकीय कार्यालयात नावापुरती तंबाखू बंदी
शासकीय कार्यालयांत तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी असली तरी खर्रा चवीने शासकीय कार्यालयात वापरला जातो. खासगी कार्यालयाच्या तुलनेत शासकीय कार्यालयांमध्ये खर्ऱ्याचे सेवन अधिक प्रमाणात होत असून, कामाचा व्याप व ताण सांभाळताना शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी दिवसातून दोन ते तीन खर्रा पचविताना दिसतात.
कोट
आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणावर नजर टाकली असता, २९७ जणांचे खर्ऱ्यामुळे तोंड उघडणे बंद झाले आहे. सहा हजार लोक दररोज तंबाखू खात असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे.
- हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे
पान ३ ची लिड