२९७ पं.स. निवडणुकीसाठी आयोगाची पूर्वतयारी
By Admin | Updated: December 4, 2015 00:29 IST2015-12-04T00:29:33+5:302015-12-04T00:29:33+5:30
राज्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

२९७ पं.स. निवडणुकीसाठी आयोगाची पूर्वतयारी
लगबग : २०१५ मधील निवडणुकांचे ‘इंडेक्स कार्ड’ तयार करणार
गजानन मोहोड अमरावती
राज्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निर्भय, मुक्त वातावरणात व पारदर्शक वातावरणात या निवडणुका व्हाव्यात, यासाठी आयोगाने २६ नोव्हेंबरला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सन २०१५ मध्ये झालेल्या सर्व निवडणुकांचे ‘इंडेक्स कार्ड’ तयार करून ३१ जानेवारी २०१६ पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ते आयोगाकडे पाठवावे लागणार आहे.
आगामी निवडणुकीसाठी तसेच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असेल सन २०१५ मध्ये झालेल्या सर्व निवडणुकांच्या सांख्यिकी माहितीचे सर्वसमावेशक ‘डॉक्युमेंट’ तयार करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाने दिले आहेत.
यामध्ये मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, संवेदनशील मतदान केंद्र, मतदान कर्मचारी, पोलीस दल, करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई, आचारसंहितेचे उल्लंघन तसेच निवडणूक निकालांचे सर्व प्रकारचे विश्लेषण, निवडणुकीत राबविलेले नवीन प्रयोग, नवीन कल्पना, विशेष परिस्थिती हाताळणे आणि महत्त्वपूर्ण फोटो आयोगाने मागविले आहेत.
राज्यात मार्च २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या २९७ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव, भातकुली व धारणी या पंचायत समितींचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व लोणार येथे तर यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, नागपूर जिल्ह्यात नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारशिवणी, रामटेक, मौदा, कामठी, नागपूर, ग्रामीण, हिंगणा उमरेड, कुही, भिवापूर, वर्धा जिल्ह्यात आष्टी, कारंजा, आर्वी, शेलू, वर्धा, समुद्रपूर, देवळी, हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, मूल, सावली, पोभुर्णा, गोंडपिंपरी, बल्लारपूर, कोपणी, जेवती, राजुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या पंचायत समितींचा समावेश आहे.
नोडल अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती
जिल्हाधिकाऱ्यांद्वारा त्यांच्या कार्यालयामध्ये निवडणुकीचा व संगणकाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याला आयोग व ‘महाआॅनलाईन’शी सतत संपर्क ठेवावा लागेल. ‘महाआॅनलाईन’ने तयार केलेल्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये योग्य ती दुरुस्ती करून फिल्ड ट्रायल एप्रिल-मे २०१६ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये मतदार नोंदणी मोहीम
आयोगाच्या सूचनेप्रमाणे ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला होता. तशीच मोहीम जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये घेण्यात येणार आहे. यापुढे मतदार यादी योग्य नाही, अशी तक्रार येता कामा नये, अशी तंबी आयोगाने दिली आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर
मतदानाची टक्केवारी नागरी क्षेत्रात कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापूर्वी झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी मतदान ६० टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन कल्पक योजना कराव्यात, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.