२८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
By Admin | Updated: November 11, 2015 00:08 IST2015-11-11T00:08:20+5:302015-11-11T00:08:20+5:30
शासकीय आरोग्य प्रयोगशाळेच्या आॅक्टोबर महिन्यातील अहवालात जिल्ह्यातील १२ टक्के पाणी दूषित आढळून आले असून ...

२८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
जिल्ह्यात १२ टक्के दूषित पाणी : शासकीय आरोग्य प्रयोगशाळेचा अहवाल
वैभव बाबरेकर अमरावती
शासकीय आरोग्य प्रयोगशाळेच्या आॅक्टोबर महिन्यातील अहवालात जिल्ह्यातील १२ टक्के पाणी दूषित आढळून आले असून शहरातील महापालिका क्षेत्रातील २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अनुजीव तपासणीतून निष्पन्न झाले आहे.
जिल्ह्यात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे रोगराई दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडूंब भरली आहेत. मात्र, पाणी शुध्दीकरणाकडे अद्याप प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घातले नसल्याचे दिसून येते. एकीकडे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासनाने लक्ष वेधणे आता काळाची गरज झाले आहे. आरोग्य प्रयोगशाळेने आॅगस्ट महिन्यात केलेल्या पाण्याच्या अनुजीव तपासणीत जिल्ह्यातील १ हजार ५५७ पाणी नमुन्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये २८७ नमुने दूषित आढळून आलेत. सप्टेंबरमध्येही १४ टक्के पाणी दूषित आढळून आले असून आॅक्टोबर महिन्यात १२ टक्के दूषित पाणी आढळले आहे. आॅक्टोबर महिन्यांत प्रयोगशाळेत १०३३ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये १८६ नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे विविध आजार बळावत आहेत. परिणामी आजार वाढत आहेत.