चांदूर बाजार नगर पालिकेच्या २.७५ कोटींच्या विकासकामांना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:10+5:302021-04-10T04:12:10+5:30
चांदूर बाजार : स्थानिक नगरपालिकेतर्फे विकासकामांकरिता निविदा बोलावण्यात आल्या होत्या. त्यासाठी जिल्हाभरातील कंत्राटदारांनी पालिकेत ऑनलाइन निविदा सादर केल्या. पालिका ...

चांदूर बाजार नगर पालिकेच्या २.७५ कोटींच्या विकासकामांना स्थगिती
चांदूर बाजार : स्थानिक नगरपालिकेतर्फे विकासकामांकरिता निविदा बोलावण्यात आल्या होत्या. त्यासाठी जिल्हाभरातील कंत्राटदारांनी पालिकेत ऑनलाइन निविदा सादर केल्या. पालिका सभागृहाने पात्र कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्याचा ठरावही घेतला. मात्र नंतर मुख्याधिकाऱ्यांनी २.७५ कोटी रुपयांचे काम पात्र कंत्राटदारांकडून हेतुपुरस्सर काढल्याने सदर कंत्राटदाराने विभागीय आयुक्तांकडे अपील केली. यावर विभागीय आयुक्तांनी त्या कामांना तात्पुरती स्थगिती दिली आहे.
शहरातील विकासकामांकरिता पालिकेत भक्कम निधी शिल्लक असताना मर्जीतीली कंत्राटदारांना काम देण्यासाठी सरसावलेले पालिकेचे मुख्याधिकारी पराग वानखडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नगर पालिका प्रशासनाने ७ डिसेंबर २०२० रोजी निविदा बोलावल्या होत्या. यात शहरातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता अंतर्गत नोंदणीकृत असलेले शासकीय कंत्राटदार पंकज शिरभाते यांनी जाहीर केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून निविदा अर्ज सादर केला होता. कंत्राट घेण्यासाठी शिरभाते यांनी १५ ते १६ टक्के कमी दराने चार कामेसुद्धा घेतली.
या कामांना नगरपालिकेच्या सभागृहाने २५ जानेवारी २०२१ रोजी ठराव घेऊन मंजुरीसुद्धा दिली. मात्र, यानंतर मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी पंकज शिरभातेंना मिळालेले ९५ लक्ष, ९० लक्ष व ८१ लाखांची तीन कामे नियमबाह्य पद्धतीने आपल्या मर्जीतील ३ कंत्राटदारांना दिल्याचा आरोप कंत्राटदार पंकज शिरभाते यांनी केला आहे. शिरभाते यांनी एकूण चार कामे घेतली होती. मात्र, मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी अतिरिक्त सुरक्षा शुल्काच्या नावावर पात्र कंत्राटदार शिरभाते यांना डावलण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिरभाते यांना पत्राद्वारे अतिरिक्त सुरक्षा शुल्काचा व अंतिम दिनांकची माहिती देण्यात आली नाही. तसेच शिरभाते यांना १ कोटी २० लाख या एकाच कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. पालिकेने उर्वरित ३ कामांचे अतिरिक्त सुरक्षा रकमेचा भरणा करण्याचे पत्र शिरभाते यांना दिले. मात्र, एक कोटी २० लाखांच्या कामाचे अतिरिक्त सुरक्षा शुल्क भरण्याचे कोणतेच पत्र मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी दिले नाही. शिरभाते यांनी ५ मार्च २०२१ रोजीच अतिरिक्त सुरक्षा रकमेची १० लक्ष रुपयांचा भरणा केला होता. झालेली चूक लक्षात येताच मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी २६ मार्च २०२१ रोजी शिरभाते यांना पत्राद्वारे ते पात्र असलेल्या चारही कामांचे २६ लाख रुपये अतिरिक्त सुरक्षा रकमेचा भरणा करण्याबाबत कळविले. मात्र, मर्जीतील कंत्राटदारांना मुख्याधिकाऱ्यांनी १९ मार्च २०२१ रोजीच कामाचे कार्यारंभ आदेश दिले.
असा आहे आदेश
याबाबत कंत्राटदार पंकज शिरभाते यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केली होती. यावर विभागीय आयुक्तांनी ५ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार तीनही कामांवर तसेच मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर दिलेल्या तीनही कंत्राटदारांच्या कामाच्या कार्यारंभ आदेशाला निकाल लागेपर्यंत तात्पुरती स्थगिती आदेश दिला आहे.
------------------