वैयक्तिक शौचालयासाठी २६ जानेवारीची 'डेडलाईन'
By Admin | Updated: January 9, 2017 00:10 IST2017-01-09T00:10:16+5:302017-01-09T00:10:16+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी २६ जानेवारीची 'डेडलाईन' देण्यात आली आहे.

वैयक्तिक शौचालयासाठी २६ जानेवारीची 'डेडलाईन'
७७०० पूर्णत्वास : १९ जणांविरुद्ध फौजदारी
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी २६ जानेवारीची 'डेडलाईन' देण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून फेब्रुवारीमध्ये होणारे स्वच्छ सर्व्हेक्षणसाठी शहर हागणदारीमुक्त करण्याचा घेतलेला संकल्प पाहता वैयक्तिक शौचालय उभारणीवर अधिक भर दिला जात आहे.
अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या नेतृत्वात पाचही सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नेताम, स्वच्छता अधिकारी जाधव, वरिष्ठ स्थास्थ्य निरीक्षक आणि स्वास्थ निरीक्षकांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापालिकेने १४ हजार ४९ लाभार्थ्यांना ८५०० रुपये याप्रमाणे पहिला हप्ता दिला होता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यातील ७ हजार ७०७ वैयक्तिक शौचालये पूर्ण झाली आहेत. या शौचालयांची ‘जिओ टॅँगिंग होऊन त्यांचा प्रत्यक्षात वापर सुरू झाला आहे. यातील ४ हजार १९१ शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. ५२९ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन ही शौचालये बांधली नाहीत. अशांपैकी ८३ लोकांनी पहिला हप्ता महापालिकेला परत केला.
उर्वरित ४४६ पैकी १९ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. या ४४६ पैकी १९ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. या ४४६ जणांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारी अभियंता १ यांच्याकडे असलेल्या योजनेतील २ हजार ८४७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. उर्वरित सर्व शौचालये २६ जानेवारीपर्यंत पूर्ण व्हावीत, यासाठी झोन स्तरावर बैठकांचा रतीब घातल्या जात आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नेताम यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. (प्रतिनिधी)
तीन टप्प्यांत दंड
१ जानवारी २०१७ पासून उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणारे आहे. तीन टप्प्यांत हा दंड वसूल करण्यात येईल. त्यानंतर फौजदारी कारवाईचा दंडुका उगारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिली.