अन् विशेष परवानगी घेऊन २५० किलोची औषधी नेपाळला रवाना
By Admin | Updated: April 29, 2015 00:15 IST2015-04-29T00:15:58+5:302015-04-29T00:15:58+5:30
नेपाळमधील भुकंपपीडितांना वैद्यकीय मदतीसाठी २५० किलोचा औषधीसाठा नेण्यासाठी नागपूर एअरपोर्ट प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.

अन् विशेष परवानगी घेऊन २५० किलोची औषधी नेपाळला रवाना
मदतकार्य सुरू : लवकरच दुसरे वैद्यकीय पथक जाणार
अमरावती : नेपाळमधील भुकंपपीडितांना वैद्यकीय मदतीसाठी २५० किलोचा औषधीसाठा नेण्यासाठी नागपूर एअरपोर्ट प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. मात्र, दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाकडून सूचना मिळाल्यावर विमानातून अखेर औषधीसाठा नेण्याची परवानगी देण्यात आली. या साठ्यासह अमरावती विभागातील सात जणांचे पथक सोमवारी रात्री नेपाळला रवाना झाले आहे.
नेपाळ येथील भूकंपग्रस्तांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू असताना अमरावती विभागाच्या आरोग्य खात्यानेही वैद्यकीय सेवेसाठी मदतीचा हात दिला. सोमवारी अकोला आरोग्य येथील उपसंचालक कार्यालयामार्फत २५० किलो वजनाचे वैद्यकीय साहित्य व सात जणांचे पथक नेपाळकरिता रवाना होणार होते. रात्री ७.४५ वाजता नागपूर येथील इंडिगो एअरलाईनचे विमान (ई-२०२) दिल्लीकडे रवाना होणार होते. त्यामध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी आरोग्य विभागाने विमानतळ प्रशासनाला रीतसर पत्रही दिले होते. मात्र, २५० किलोचे वैद्यकीय साहित्य विमानातून नेता येणार नाही. प्रतिकिलो २५० रुपये शुल्क अदा करावे लागेल, अशा सूचना विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे अमरावतीच्या पथकाची ताराबंळ उडाली. ही बाब त्यांनी आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे यांना कळविली. त्यांनी तत्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दिल्ली येथे भुकंपपीडितांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सदनातील कक्षाला संपर्क केला. सदनातील अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रशासनाशी संपर्क करून परवानगी घेतली. आणि अखेर चमू व साहित्य रवाना झाले. हे पथक काठमांडुत मदतीसाठी पोहचले. नॅशनल डिझॉस्टर रिलीफ फोर्सच्या माध्यमातून अमरावतीची पथके भुकंपपीडिताना मदत करीत आहेत.
अमरावतीचे पथक काठमांडू पोहोचले
अमरावती विभागातील सात जणांचे पथक वैद्यकीय साहित्य घेऊन रात्री १०.२० वाजता विमानाने दिल्ली पोहचले. तेथील महाराष्ट्र सदनात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तेथील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अमरावतीचे पथक मिल्ट्रीच्या विमानाने नेपाळ येथील काठमांडूत पोहचले आहे.
आॅक्सिजन सिंलिडरची परवानगी नाकारली
भुकंपपीडितांसाठी अमरावती विभागामार्फत आॅक्सिनजचे सिलिंडर नेण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट प्रशासनाने आॅक्सिजन नेण्यास परवानगी दिली नाही.
दुसरेही पथक सज्ज
भुकंपपीडितांच्या मदतीसाठी एक पथक रवाना झाले. त्या पथकाने मदतकार्य सुरु केले. त्यांचे साहित्य संपल्यावर पुन्हा दुसरे पथक अमरावतीवरून रवाना होणार आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत दुसरे पथक सज्ज करण्यात आले आहे.
आम्ही २५० किलो वजनाचे वैद्यकीय साहित्य जुळविले. नियामानुसार ते विमानातून वाहून नेता येत नव्हते. दिल्लीशी संपर्क करून ती समस्या सोडविली. पथक नेपाळमध्ये सेवा देत आहे.
डॉ.अविनाश लव्हाळे,
आरोग्य उपसंचालक.