२५० घनमीटर अवैध लाकूड तरीही आरागिरणी सील का नाही?
By Admin | Updated: September 25, 2016 00:23 IST2016-09-25T00:23:11+5:302016-09-25T00:23:11+5:30
स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवरलाईननजीकच्या नवदुर्गा सॉ मिलमध्ये रविवारी १८ सप्टेंबर रोजी ८ ते १० ट्रक लाकूड आढळल्याप्रकरणी चौकशी आरंभली आहे.

२५० घनमीटर अवैध लाकूड तरीही आरागिरणी सील का नाही?
अमरावती : स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवरलाईननजीकच्या नवदुर्गा सॉ मिलमध्ये रविवारी १८ सप्टेंबर रोजी ८ ते १० ट्रक लाकूड आढळल्याप्रकरणी चौकशी आरंभली आहे. मात्र सहा दिवसांचा कालावधी लोटला असताना २५० घनमीटर अवैध लाकूडप्रकरणी सॉ मिल सील का करण्यात आले नाही? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
सहा दिवसांपूर्वी नवदुर्गा आरागिरणीवर अवैध लाकूड आढळले. परंतु लाकूड तपासणीच्या नावे वेळकाढू धोरण आखले जात असल्याचे चित्र आहे. या आरागिरणीत २५० घनमीटर अवैध लाकूड असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. नवदुर्गा सॉ मिल मालकांनी सदर लाकूड हे जिल्हा स्त्री रुग्णालयातून आणल्याचा दावा केला आहे. तसे सहा महिन्यांपूर्वी वृक्षतोड परवानगीचे आदेशही वनविभागाला सादर केल्याची माहिती आहे.
मात्र शहरातून वृक्षतोड केल्यानंतर आरागिरणीत लाकूड आणण्यापूर्वी वृक्षाची वर्गवारी वनविभागास का सादर करण्यात आली नाही, हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. मार्च महिन्यात डफरीनमध्ये वृक्षतोड करण्यात आली, तर सहा महिन्यांनंतर आरागिरणीत लाकूड आले कसे? याचा शोध आरागिरणी वनपालांनी का घेतला नाही, याचे वरिष्ठांनी चिंतन करावे, असे बोलले जात आहे.
लाकडाचे मोजदाद करण्यासाठी सहा दिवस लागत असेल तर या सहा दिवसांमध्ये आरागिरणीत किती अवैध लाकूड फस्त झाले हे वनकर्मचाऱ्यांना देखील चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. स्थानिक इतवारा बाजारात काही महिन्यांपूर्वी गुरुकृपा आरागिरणीत एक क्विंटल अवैध लाकूड आढळले असताना चार महिन्यांपर्यंत सॉ मिल सील करण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र नवुदर्गा सॉ मिलवर २५० घनमीटर अवैध लाकूड आढळले असताना केवळ लाकूड तपासणीचा फार्स रचून आरागिरणी मालकाला अभय दिले जात असल्याचे वास्तव आहे. (प्रतिनिधी)