२५ हजार अंध-अपंगांच्या पुनर्वसनाचे समाधान
By Admin | Updated: August 11, 2014 23:38 IST2014-08-11T23:38:27+5:302014-08-11T23:38:27+5:30
महाराष्ट्रातील सुमारे २० लाख अंध-अपंगांपैकी सुमारे २५ हजार अंध-अपंगांचे वैद्यकीय, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक पूनर्वसन नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लार्इंड ‘नॅब’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून

२५ हजार अंध-अपंगांच्या पुनर्वसनाचे समाधान
अशोक बंग यांची मुलाखत : महाराष्ट्र शासनाचा ‘नॅब‘ला पुरस्कार
अमरावती : महाराष्ट्रातील सुमारे २० लाख अंध-अपंगांपैकी सुमारे २५ हजार अंध-अपंगांचे वैद्यकीय, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक पूनर्वसन नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लार्इंड ‘नॅब’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया नॅब संस्थेचे अ.भा. उपाध्यक्ष व महाराष्ट्र युनिटचे माजी अध्यक्ष अशोक बंग यांनी दिली.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने यावर्षीचा फुले, शाहू, आंबेडकर पुरस्कार नाशिक येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लार्इंड ‘नॅब’ या सामाजिक संस्थेला मिळाला. यानिमित्त या संस्थेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र युनिटचे अशोक बंग यांनी ‘लोकमत’कडे संस्थेचे कार्य व भविष्यातील ध्येयाची उकल केली.
नाशिक येथील प्रसिध्द व्यावसायिक असलेले अशोक बंग यांनी नॅब या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली ३० वर्षांपासून अंधांच्या पूनर्वसनाचे कार्य हाती घेतले. ते म्हणाले, अंध-अपंगांच्या पूनर्वसनाचे कार्य करताना नॅब संस्थेला शासन व समाजातील दानशुरांची साथ मोलाची आहे. त्यानंतर या कार्याची दखल घेऊन शासनाकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शासनाकडून पाठीवर शाबासकीची थाप दिल्याचा आनंद असल्याचे मत अशोक बंग यांनी व्यक्त केले.
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मर्चंट यांनी नॅब संस्थेची शाखा स्थापन केली. हेमंत टकले, देवकिसन सारडा यांच्या आग्रहास्तव या संस्थेत पदार्पण केले आणि अंध-अपंगांच्या सर्वांगाच्या पूनर्वसन कार्यात पूर्णपणे गुंतल्या गेलो. महाराष्ट्रातील १८ जिल्हा शाखेच्या माध्यमातून २५ ते ३० हजार अंध-अपंगाचे पूनर्वसन करण्यात नॅब संस्थेला यश मिळाल्याचे समाधान बंग यांनी मानले. परंतु अंध-अपंगांना अधिकाधिक सोई-सुविधा मिळाव्यात आणि त्यांना समाजात मानाने जगण्याचे बळ व आत्मविश्वास निर्माण करण्याच्या कार्याला राज्य शासनाच्या या पुरस्काराने उभारी मिळाल्याचे बंग म्हणाले.
‘नॅब’चे पुढी उद्दिष्टाबाबत बोलताना बंग म्हणाले, अपंगाचे कार्य अधिक सक्षमपणे करण्यासाठी संस्थेची रिसर्च अँड डेव्हल्पमेंट इन्स्टिट्युट तयार करायची आहे. तसेच पूनर्वसनासाठी नवतंत्रज्ञान तयार करुन आंतरराष्ट्रीय कार्याची सांगड घालण्याचा भविष्यात नॅब संस्थेचा प्रयत्न राहणार आहे. अपंगांच्या शिक्षण क्षेत्रात विशेष शिक्षक व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची कमी आहे. यासाठी नाशिकला अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यासह ग्रामीण क्षेत्रातील अंधासाठी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या राहत्या घरीच पूनर्वसन करण्याचा कार्यक्रम वाढविण्याचा नॅबचा भविष्यातील प्रयत्न असल्याचेही अशोक बंग यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.