रोहयोच्या अपूर्ण विहिरींसाठी २५ टक्के अग्रीम रक्कम
By Admin | Updated: May 3, 2015 00:15 IST2015-05-03T00:15:51+5:302015-05-03T00:15:51+5:30
मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत,

रोहयोच्या अपूर्ण विहिरींसाठी २५ टक्के अग्रीम रक्कम
दिलासा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंत कामे करावीत
अमरावती : मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार आहे. सदर शेतकऱ्यांनी ३० मे पर्यंत कामे पूर्ण करावी. यासाठी लाभार्थींना रक्कम वाटपासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत.
मग्रारोहयोअंतर्गत जिल्हाभरात सध्या अपूर्ण व नवीन परंतु यापूर्वी रद्द झालेल्या विहिरींना शासनाने मंजुरी दिल्याने रोहयोअंतर्गत ही कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विहिरी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. अशात जिल्ह्याभरात मग्रारोहयोच्या अपूर्ण विहिरींची संख्याही बरीच आहे. त्यामुळे ही कामे शेतकऱ्यांनी गतीने करावीत. यामध्ये २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे. ३० एप्रिल रोजी ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करुन नवीन कामाची मागणी नोंदवून मजुरांना कामे लगेच उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. अशा परिस्थितीत मजुरांच्या कामाची वाढती मागणी लक्षात घेता अंदाजपत्रक तयार केले जात आहे. यासाठी वर्ष २०१५-१६ साठी जिल्ह्याचा लेबर बजेटचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला. जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या ५ किलोमीटर परिसरात मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे,असे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत.