‘त्या’ २५ एम.फिल. प्राध्यापकांकडून पदोन्नतीची रक्कम होणार वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:30+5:302021-03-13T04:22:30+5:30
अमरावती : नेट, सेट नसताना केवळ एम.फिल. पदवीच्या आधारे पदोन्नतीचा (कॅस) लाभ घेणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ...

‘त्या’ २५ एम.फिल. प्राध्यापकांकडून पदोन्नतीची रक्कम होणार वसूल
अमरावती : नेट, सेट नसताना केवळ एम.फिल. पदवीच्या आधारे पदोन्नतीचा (कॅस) लाभ घेणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये २५ प्राध्यापक आहे. नेट-सेट नसणाऱ्या अशा प्राध्यापकांकडून पदोन्नतीच्या लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने तयारी चालविली आहे.
राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने पदोन्नतीचा लाभ घेणाऱ्या एम.फिल. प्राध्यापकांची शोधमोहीम चालविली आहे. विद्यापीठांनी प्राध्यापकांना मान्यतापत्र देताना जाणीवपूर्वक हलगर्जी केल्यामुळे सरकारला कोट्यवधीचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नेट-सेट नसणाऱ्या एम.फिल. पदवीधर प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ देणारे अधिकारी, तत्कालीन संचालक, प्राध्यापकल प्राचार्य यांच्यावरही गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने सहायक प्राध्यापकपदासाठी साधारण १९९१ पासून नेटची अर्हता अनिवार्य केली आहे. त्यानंतर यूजीसीने १ जून २००९ रोजी सुधारित अधिसूचना काढून त्यात ‘एम.फिल.’ची तरतूद केली. यूजीसीच्या २००६ च्या तरतुदीच्या चुकीचा अर्थ काढून २००६ पूर्वीच्या अध्यापकांना नेट किंवा सेट ही अर्हता नसताना एम.फिल. पदवीवरच ‘कॅस’चे लाभ देण्यात आले आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या वेतनात दरमहा ४० हजारांची वाढ झाली आहे. अनेक जण प्राचार्य पदापर्यंत पाेहोचले आहेत. त्यांच्याकडून पदोन्नती लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे.
—————————
विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये नेट, सेट नसणाऱ्या सुमारे २५ एम.फिल. पदवी प्राध्यापक आहे. त्यांना ‘कॅस’चा लाभ घेतला असून, पदोन्नती तारखेपासून शासननिर्देशानुसार वेतन लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
- केशव तुपे, सहसंचालक (उच्च शिक्षण), अमरावती.
——————
एमफिल पात्रताधारक प्राध्यापकांच्या संदर्भात शासनाने जारी केलेल्या अन्यायकारक पत्राविरोधात सहसंचालकांकडे निवेदन सादर केले आहे. नेट-सेटमधून सूट आणि अनुषंगिक लाभ देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
- प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच, अमरावती.