आत्महत्येपूर्वी फेसबुकवर २५ पानांचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 21:45 IST2018-09-11T21:45:36+5:302018-09-11T21:45:53+5:30
‘आई, बाबा तुम्ही माझ्यासाठी आयुष्य खर्च केले. मात्र, मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. मला माफ करा. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म घेण्याची माझी इच्छा आहे’ अशा आशयाचे तब्बल २५ पानांचे पत्र फेसबूकवर पोस्ट करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघड झाली़

आत्महत्येपूर्वी फेसबुकवर २५ पानांचे पत्र
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव (रेल्वे) : ‘आई, बाबा तुम्ही माझ्यासाठी आयुष्य खर्च केले. मात्र, मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. मला माफ करा. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म घेण्याची माझी इच्छा आहे’ अशा आशयाचे तब्बल २५ पानांचे पत्र फेसबूकवर पोस्ट करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघड झाली़
प्रफुल सुरेश शेंद्रे (रा़जळगाव मंगरूळ) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता गावातीलच मनोज शिवरकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले़ तो एका खासगी वित्तीय संस्थेत कर्मचारी म्हणून कार्यरत होता़ ३१ मे २०१७ रोजी त्याचा विवाह पुलगाव येथे झाला होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व सहा महिन्यांचा मुलगा आहे़ प्रफुलने चिठ्ठीत विशद केल्यानुसार, त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहते. अनेकदा आणायला गेल्यानंतर सासरे व सासूने तिला व बाळाला पाठविले नाही़ मुलाला पोळ्यात बैल दाखविण्यासाठी घेऊन जाण्याची इच्छा होती़
स्वत:ला जीवन जगण्याची इच्छा असताना मुलगा आपल्याजवळ नाही, याचे शल्य आपल्याला बोचत आहे़ त्यामुळे आपण स्वत: जीवन संपवित असून, कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही चिठ्ठीत प्रफुलने नमूद केले आहे़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़