शासकीय विभागांची २५ टक्के मालवाहतूक होणार एसटीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:43+5:302021-05-07T04:13:43+5:30
अमरावती : गत वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोना संकट घोंगावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून राज्यात कठोर निर्बध लागू करण्यात ...

शासकीय विभागांची २५ टक्के मालवाहतूक होणार एसटीतून
अमरावती : गत वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोना संकट घोंगावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून राज्यात कठोर निर्बध लागू करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात बसला आहे. एसटी महामंडळाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून शासनाच्या विविध विभागामार्फत होणाऱ्या खासगी मालवाहतुकीच्या २५ टक्के मालवाहतुकीचे काम एसटी महामंडळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: लॉकडाऊनमध्ये एसटीच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. अनलॉक नंतर काही प्रमाणात एसटीची गाडी पुन्हा रुळावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंतरराज्य तसेच आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोरोना संकटामुळे लोकांचा प्रवास कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम एसटी महामंडळा झाला आहे. उत्पन्न घटल्याने कर्मचार्यांचे वेतनासाठी सुद्धा एसटी प्रशासन व राज्य शासनाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला ही समिती मंत्रिमंडळाचे निर्णय अंमलबजावणी तसेच महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम करणार आहे.
बॉक्स
इतर शासकीय वाहनांची दुरुस्ती होणार
राज्यात एसटी महामंडळाचे ९ टायर्स पुन:स्तरण सयंत्र कार्यरत आहेत. त्याव्दारे शासकीय उपक्रमांमध्ये वापरली जाणारी ५० टक्के अवजड वाहने आणि प्रवासी वाहने यांच्या टायरचे पुन:स्तरण करण्यात येणार आहे. महामंडळाचे विभागीय कार्यशाळेत अवजड आणि प्रवासी शासकीय वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती होणार आहे.