शहरातील रस्ते विकासाकरिता २५ कोटी रुपये मंजूर
By Admin | Updated: July 30, 2016 23:59 IST2016-07-30T23:59:24+5:302016-07-30T23:59:24+5:30
शहरातील रस्ते विकासाकरिता शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शहरातील रस्ते विकासाकरिता २५ कोटी रुपये मंजूर
देशमुख यांचा पाठपुरावा : अर्थमंत्र्यांकडून हिरवी झेंडी
अमरावती : शहरातील रस्ते विकासाकरिता शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आ.सुनील देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने हा निधी मंजूर केल्याचे पत्र अर्थमंत्र्यांनी दिले आहे. यात शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण होईल. पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २१ जुलै रोजी आ. देशमुख यांना पत्र लिहून ही बाब कळवली आहे. तसेच भविष्यात सुद्धा आ. सुनील देशमुख यांच्या विकासासंबंधित योग्य सूचनांचे सदैव स्वागत करण्यात येईल, असेही आश्वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे.
शहराच्या रस्त्यांच्या व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या एकात्मिक रस्ते विकास योजनेची मुहूर्तमेढ आ.देशमुख यांनी केली होती. त्यातून या शहरातील अंतर्गत रस्ते रुंद व मजबूत करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील रस्त्यांकडे पाहिजे त्या स्वरुपात लक्ष न दिल्यामुळे तसेच निधीच्या कमतरतेमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शहरातील काही मुख्य रस्त्यांच्या कायमस्वरुपी सुधारणेच्या दृष्टिकोनातून आ. देशमुख यांनी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत काँक्रीट रस्ते निर्मितीसाठी अमरावती शहरांतर्गत ४८५ कोटी रुपये निधी मंजूर करवून घेतला. त्यामध्ये शहरातील जुन्या व नवीन महामार्गाचा समावेश आहे. महापालिकेच्या अखत्यारितील मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी निधीच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आ. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. त्याच्या प्रयत्नांना यश येवून अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी २५ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आली असून त्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रमुख मार्गांचे काँक्रीटीकरण होणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.