वणीवासीयांना २४ तास शुद्ध पाणी

By Admin | Updated: February 3, 2016 00:14 IST2016-02-03T00:14:17+5:302016-02-03T00:14:17+5:30

वणी (बेलखेड) ग्रामपंचायतीने नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी त्यांना २४ तास शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना कार्यान्वित केली आहे.

24-hour pure water for the dwellers | वणीवासीयांना २४ तास शुद्ध पाणी

वणीवासीयांना २४ तास शुद्ध पाणी

ग्रामपंचायतीचा उपक्रम : १३व्या वित्त आयोगातील ४ लाख ६५ हजार रुपये खर्च
चांदूरबाजार : वणी (बेलखेड) ग्रामपंचायतीने नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी त्यांना २४ तास शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना कार्यान्वित केली आहे. या नावीन्यपूर्ण व अभिनव योजनेचे लोकार्पण ना. प्रवीण पोटे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ.बच्चू कडू उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने ही योजना शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाचा ४ लाख ६५ हजार इतका निधी वापरून निर्माण केली. या योजनेंतर्गत स्थानिक नागरिकांना ५ रूपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने दोन हजार लिटर क्षमतेचे आर.ओ. फिल्टर मशीन बसविले. ग्रामपंचायतीच्या आवारात बसविण्यात आलेली ही फिल्टर मशीन स्वयंचलित असून यात पाच रुपयांचे नाणे टाकताच पाच लिटर पाणी नाणे टाकणाऱ्यास प्राप्त होणार आहे. एक व दोन रूपयांचे नाणे मशिनमध्ये टाकणाऱ्याससुद्धा चार ते आठ लिटर पाणी या मशिनमधून प्राप्त होणार आहे. या योजनेतून ग्रामपंचायतीने नागरिकांचे आरोग्य व ग्रामपंचायत उत्पन्न या दोन्ही बाबी साध्य केल्या आहे. शुद्ध पेयजल योजनेला गावकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्र्यांनी जलशिवार योजनेंतर्गत नाल्याचे खोलीकरण व वृंदीकरणाचे व पांदण रस्त्याचेही भूमिपूजन केले. तसेच आमदार बच्चू कडू व ग्रामपंचायत वणी यांच्या वेगवेगळ्या निधीतून घेण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यात शुद्ध पाणी योजनेशिवाय पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, १३ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे नुतनीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वॉलकंपाऊंडचे उद्घाटन, भगवान गौतमबुद्ध सभागृहाचे लोकार्पण, महात्मा फुले पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन, स्मशानभूमिच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन, भवानी मंदिर वॉलकंपाऊंडचे भूमिपूजन व बेलखेड येथील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण इत्यादी विकासकामे पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांच्या सेवेत समर्पीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शिल्पा बोबडे, सरपंच सुरज चव्हाण, उपसभापती राजेश सोलव, कविता दामेदर, अर्चना अवसरमोल, मंगेश देशमुख, बापूसाहेब देशमुख, राजेश वाटाणे उपस्थित होते.

Web Title: 24-hour pure water for the dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.