२२ लाखांच्या जमीन महसुलात मिळणार सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:51+5:302021-02-05T05:34:51+5:30
अमरावती : खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाही तालुक्यांची ५० च्या आत पैसेवारी जाहीर केली. ही एकंदर ...

२२ लाखांच्या जमीन महसुलात मिळणार सूट
अमरावती : खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाही तालुक्यांची ५० च्या आत पैसेवारी जाहीर केली. ही एकंदर दुष्काळस्थिती असल्याने सहा प्रकारच्या सवलतींचा मार्ग आता सुकर झाला आहे. लवकरच याविषयीचा शासनादेश निघणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना किमान २२ लाखांच्या जमीन महसुलात सूट मिळण्याची शक्यता आहे.
यंदाच्या खरीप हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन हे शेतकऱ्यांचे ‘कॅश क्रॉप’ पूर्णत: उद्ध्वस्त झाले. ऐन सवंगणी, कापणीच्या हंगामात पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे सोयाबीन सडले, प्रतवारी खराब झाली व शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडलेला नाही. यंदाच्या खरिपात किमान ४० टक्के क्षेत्रात सोयाबीन होते. यासोबतच ६० दिवसांच्या कालावधीतले मूग व उडीद पिकांची या पावसाने वाट लावली आहे.
कपाशीवरदेखील सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन बोंडसड सुरू झालेली आहे. किमान ८० टक्के कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. यासोबतच गुलाबी बोंडअळीचे नुकसान आहेच. सर्वच चौदाही तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसाने सर्व पिकांची वाट लावली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी खरिपाची अंतिम पैसेवारी ५० च्या आत जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे आता सहा प्रकारच्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांना याविषयी शासनादेशाची प्रतीक्षा आहे.
बॉक्स
परीक्षा शुल्कात माफीही मिळणार
जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रचलित सवलतींचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, शाळा व महाविद्यालयीन शिक्षण शुल्कमाफी, पीककर्ज वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठण आदी सवलती मिळतात. यंदा शासनाकडे अद्यापही घोषणा न केल्यामुळे शेतकऱ्यांना शासनादेशाची प्रतीक्षा आहे.
बॉक्स
तालुकानिहाय जमीन महसुलाची मागणी
जिल्ह्यात ३१ मार्च २०२० पर्यंत जमीन महसुलाची मागणी ही २१.५३ लाखांची होती. यामध्ये अंशत: वाढ होण्याची शक्यता आहे.यामध्ये अमरावती १ हजार, भातकुली ३५ हजार, तिवसा २.७८ लाख, नांदगाव खंडेश्वर ७.२७ लाख, धामणगाव रेल्वे ५.५१ लाख,चांदूर रेल्वे ३.९ लाख, मोर्शी ८ हजार, वरुड १३ हजार, अचलपूर २६ हजार, चांदूर बाजार १ हजार, दर्यापूर १.२ लाख, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३ हजार रुपये आहे.
कोट
जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत असल्याने प्रचलित निकषानुसार काही सवलतींचा लाभ दिला जातो. याविषयीच्या शासनादेश अद्याप अप्राप्त आहे.
रणजित भोसले
उपजिल्हाधिकारी (महसूल)