२,१४५ कोटी पीककर्जाचे ‘लक्ष्य’

By Admin | Updated: April 13, 2016 00:11 IST2016-04-13T00:11:01+5:302016-04-13T00:11:01+5:30

जिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

2,145 crores 'target' of crop loan | २,१४५ कोटी पीककर्जाचे ‘लक्ष्य’

२,१४५ कोटी पीककर्जाचे ‘लक्ष्य’

२ लाख ९७ हजार शेतकरी खातेदार : जून २०१६ पर्यंत वाटपाचे शासनाचे निर्देश, सहा कर्ज मेळावे घेण्याच्या सूचना
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना १ हजार ७५९ कोटी ४५ लाख रुपये पीककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. याच आराखड्यात रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजार रूपये पीककर्ज वाटपाची तरतूद करण्यात आली आहे, असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे पीककर्ज दोन्ही हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे.
सततची नापिकी, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहेत. मागील वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपाच्या हंगामात बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. शासनाने जिल्ह्यात २३ मार्च रोजी दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
दाही दिशेने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी वेळीच पीककर्ज दिल्यास खरीप हंगामाची तयारी करूशकणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १९ मार्च रोजी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याची बैठक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर बॅँकांचे अधिकारी व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा ८ व ९ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासन गंभीर आहे. मागील वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांच्या खरीप पीककर्जाचे व ३६७ कोटी ७५ लाखांच्या रबी पीककर्जाचे उद्दिष्ट होते. यापैकी ३१ मार्च २०१५ अखेर खरिपाला १ हजार ३७१ कोटी ५० लाख व रबीला ६५ कोटी ९६ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ६९ टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना खरिपासाठी १७५९ कोटी ४५ लाख ७६ हजारांचे व रबीसाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बॅँकांनी एप्रिल २०१६ पासून खरीप पीककर्ज वाटपाची सुरूवात करावी. हा लक्ष्यांक ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

पीककर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’
बॅँकांनी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात करावी. त्यासाठी बॅँकांना जून २०१६ पर्यंत प्रत्येक महिन्याला दोन याप्रमाणे सहा पीककर्ज मेळावे घेऊन पीककर्ज वाटपाची प्र्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियानात मेळावे घेऊन पीककर्ज वाटप करावे, या कामात हलगर्जीपणा केल्यास प्रत्येक शाखा व्यवस्थापकास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ठणकावून सांगितले आहे.

शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी
शेतकरी बॅँकेत येतो तेव्हा बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटावे. शेतीसंबंधी योजना समजावून सांगाव्यात व त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, शेतकऱ्यांसाठी बँकाच्या प्रत्येक शाखेने मेळावे घ्यावेत व प्रसंगी महसूल विभागाची मदत घ्यावी, तसेच महाराजस्व अभियानात स्टॉल लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: 2,145 crores 'target' of crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.