२१ अर्ज रद्द, २०७ उमेदवार कायम
By Admin | Updated: September 29, 2014 22:52 IST2014-09-29T22:52:55+5:302014-09-29T22:52:55+5:30
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सोमवारी अर्ज छाननीदरम्यान २१ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी रद्द ठरविण्यात आले. तर दोघांनी माघार घेतली. आता २०७ उमेदवार निवडणूक रिंगणात

२१ अर्ज रद्द, २०७ उमेदवार कायम
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सोमवारी अर्ज छाननीदरम्यान २१ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी रद्द ठरविण्यात आले. तर दोघांनी माघार घेतली. आता २०७ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. १ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
मोर्शी मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज सोमवारी छाननी दरम्यान ज्ञानेश्वर माधव राऊत यांचा अर्ज रद्द ठरविण्यात आला. बसपचा ‘एबी’ फॉर्म त्यांनी अर्जासोबत जोडलेला नव्हता. तसेच सोमवारी मंजुषा खांडेकर, अनिता मसाने या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात ३० उमेदवारांनी ४२ अर्ज दाखल केले होते. यातील प्रमोद तऱ्हेकर व अविनाश पाठक यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान रद्द करण्यात आला. या दोन्ही उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज होते. आता ४० उमेदवारी अर्ज राहिले आहेत.
दर्यापूर मतदारसंघात सोमवारी दोन उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान रद्द करण्यात आले. यात पी.टी पाटील, विद्यासागर वानखडे या दोघांचा समावेश आहे. खंडारे यांनी संपत्तीचे विवरण दाखल न केल्याने वानखडे यांनी बसपचा ‘एबी’ फार्म दाखल न केल्याने या दोघांचेही उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले. आता २९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मेळघाट मतदारसंघात सोमवारी दोन उमेदवारांचा बी फॉर्म न आल्याने उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. बालकराम जांबेकर (बसप) व रवी रामू पटेल (भाजप) यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.