लोकवर्गणीतून इर्विनमध्ये २० एसी
By Admin | Updated: June 27, 2016 23:58 IST2016-06-27T23:58:26+5:302016-06-27T23:58:26+5:30
लोकवर्गणीतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला २० एसी देण्यात येणार असून त्यापैकी ११ एसी जळीत कक्षात लावण्यात आलेत.

लोकवर्गणीतून इर्विनमध्ये २० एसी
प्रवीण पोटे यांची भेट : जळीत कक्षात बसविले ११ एसी
अमरावती : लोकवर्गणीतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला २० एसी देण्यात येणार असून त्यापैकी ११ एसी जळीत कक्षात लावण्यात आलेत. सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
इर्विन रुग्णालयाच्या भेटीदरम्यान पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकवर्गणीतून अशाप्रकारची कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गणमान्य नागरिकांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही देणगी सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी दिली. इर्विन व डफरीन रुग्णालयाचा काही वर्षा्त कायापालट झाला असून या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना सुविधा पुरविण्याचा पालकमंत्र्याचा मानस आहे. या सुविधेसोबतच वॉटर कुलर, वॉटर हिटर व ४० इंचीचे २० टिव्ही संच लावण्याची पालकमंत्र्यांची संकल्पना आहे. रुग्णांना उपचारादरम्यान त्यांचे दुख विसरता यावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने रुग्णांना अशाप्रकारच्या विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टर व परिचारिकांचाही ताण कमी होण्याची शक्यता आहे. यातून चांगला लाभ होईल, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी जळीत कक्षात लावलेल्या एसीची पाहणी केली. तसेच नेत्र विभागासमोरील टिन शेड, सीटी स्कॅन विभागाची पाहणी केली. तांत्रिक अडचणीमुळे सीटी स्कॅन मशिन सेट करण्याची प्रक्रिया लांबल्याचे ते म्हणाले. या व्यतिरिक्त अन्य सामाजिक कार्यासाठी कोट्यावधी लोकवर्गणीतून गोळा करून नागरिकांच्या उपयोग आणल्या जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
२० टीव्ही संच लावण्याची संकल्पना
इर्विनमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना मनोरंजनाचे चार क्षण मिळावे, यासाठी वॉर्डात २० टीव्ही संच लावण्याची पालकमंत्र्यांची संकल्पना आहे. लोकवर्गणीतून हे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक वॉर्डात दोन टीव्ही संच लावून एका संचावर संस्कारी कार्यक्रम तर दुसऱ्या संचावर बातम्याच सुरु राहील, तर लहान मुलांच्या वार्डात मनोरंजनात्मक कार्यक्रम टीव्हीह संचावर दाखविण्यात येणार आहे.