जिल्ह्यात २० हजार ६६७ विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
By जितेंद्र दखने | Updated: February 14, 2024 21:19 IST2024-02-14T21:19:00+5:302024-02-14T21:19:35+5:30
१८ फेब्रुवारीला परीक्षा : १८६ ठिकाणी परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था

जिल्ह्यात २० हजार ६६७ विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
अमरावती: पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण १८६ केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण २० हजार ६६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीचे १० हजार ९३४, तर आठवीचे ९ हजार ७३३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला स्पर्धा परीक्षेइतकेच महत्त्व आले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मुख्य चुरस पाहायला मिळते आहे. विद्यार्थी आणि पालक या परीक्षेसाठी उत्सुक असतात. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. यावर्षी राज्यात एकाच दिवशी रविवार, १८ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता पाचवी) १० हजार ९३४, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) ९ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षेसाठी पाचवीकरिता १०३, तर आठवीसाठी ८३ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शिक्षण विभागाने जिल्ह्यात १४ तालुक्यांसह महापालिका क्षेत्रात १८६ परीक्षा केंद्र निश्चित केलेली आहेत. या परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी गजाला खान, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सोनोने, हेमराज गणोरकर, रवींद्र धरमठोक आदींनी केलेले आहे.
असे आहे परीक्षेचे नियोजन
परीक्षा केंद्र संचालक - १८६
पर्यवेक्षक- १०९६
जिल्हास्तरावर भरावी पथके ०२
तालुकास्तरावर प्रत्येक - ०१
पाचवीचे परीक्षार्थी-१०९३४
आठवीचे परीक्षार्थी-९७३३