‘प्लाझ्मा’साठी २० दाते तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:24+5:30
कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) मध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याचा वापर कोरोना क्रिटिकलच्या उपचारात केला जातो. अशा रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे ‘पॅसिव्ह इम्युनिटी’ मिळाल्याने तो अल्पावधीत बरा होतो. प्लाझ्मा मिळविण्यासाठी त्या दात्याची संमती लागते, असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.

‘प्लाझ्मा’साठी २० दाते तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी आता जिल्ह्यात प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार आहे. यासाठी २० दाते तयार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंदर्भातील यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. याअनुषंगाने प्लाझ्मा बँकही तयार करण्यात येणार आहे.
कोरोना क्रिटिकल रुग्णांवर प्रभावी उपचार होऊन मृत्यूचा दर कमी करण्यासाठी ही थेरेपी उपयुक्त असल्याने याचा वापर करण्याविषयी आयसीएमआरने यापूर्वीच गाईडलाईन दिल्या आहेत. राज्यात मुंबईच्या लीलावती रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे.
कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) मध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याचा वापर कोरोना क्रिटिकलच्या उपचारात केला जातो. अशा रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे ‘पॅसिव्ह इम्युनिटी’ मिळाल्याने तो अल्पावधीत बरा होतो. प्लाझ्मा मिळविण्यासाठी त्या दात्याची संमती लागते, असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले. रक्तातून प्लाझ्मा वेगळा काढून तो मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वापरला जाईल. याद्वारे एका आठवड्यात रुग्ण बरा होऊ शकत असल्याचे सांगण्यात आले.
अशी आहे प्रक्रिया
कोरोना संक्रमणमुक्त व्यक्ती एक महिन्याच्या आत प्लाझ्मा दान करू शकते. यासाठी प्रथम चाचणी केली जाते. त्या व्यक्तीचे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ व वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. साधारणपणे १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती असावी, असे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.
अशी आहे ‘प्लाझ्मा डिराइव्ह थेरेपी’
कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये अँटिबॉडीज तयार होतात. अशा व्यक्तीची इम्यून सिस्टीम काही कालावधीसाठी चांगली होते व यामधून प्रोटिन्स उत्सर्जित होतात, जे प्लाझ्मामध्ये असतात. प्लाझ्मामध्ये असलेल्या अँटिबॉडीजला वेगळ्या काढल्या जातात आणि रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केल्या जातात. याला प्लाझ्मा डिराईव्ह थेरेपी म्हणतात. याद्वारे कोरोनाग्रस्ताच्या शरीरात या विषाणूविरुद्ध लढण्याची, प्रतिकार करण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या थेरेपीचा वापर कोणत्या रुग्णासाठी करायचा हे उपचार करणारी डॉक्टर मंडळी ठरवितात, असे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.
प्लाझ्मा देण्यासाठी २० दात्यांची नावे समोर आली आहेत. कोरोना संक्रमनमुक्त झाल्याच्या महिनाभराच्या आत त्या संक्रमणमुक्त रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा काढला जातो व संक्रमण असलेला व्यक्तीमध्ये इंजेक्ट केला जातो. याद्वारे त्यांची विषाणूविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते.
- डॉ. श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्य चिकित्सक
प्लाझ्मा थेरेपीचा आता प्रभावीपणे अवलंब केला जाणार आहे. यासाठी कोरोनामुक्त झालेले काही दातेही समोर आले आहेत. या थेरेपीसाठी आवश्यक यंत्रे जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाली आहेत. या यंत्रणेचे पालकमंत्र्यांनी उद्घाटन केले आहे.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी.