पेरण्या खोळंबल्या आठवड्यात २० टक्केच
By Admin | Updated: July 10, 2015 00:56 IST2015-07-10T00:56:28+5:302015-07-10T00:56:28+5:30
जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसात प्रदीर्घ खंड असल्याने खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत.

पेरण्या खोळंबल्या आठवड्यात २० टक्केच
अमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसात प्रदीर्घ खंड असल्याने खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत. १ जुलै अखेर ५५.६६ टक्के क्षेत्रात पेरणी झाली होती तर ८ जुलै अखेर ७६.४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. या एका आठवड्यात २० टक्केच पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असा सल्ला कृषी विभागाचा आहे.
जिल्ह्यात २४ जूनपासून पाऊस नाही. १ जून ते ८ जुलैदरम्यान पावसाची २२६.३ मि.मी. सरासरी अपेक्षित असताना २१२.४ मि.मी. पाऊस पडला. खरिपाच्या हंगामात या ३८ दिवसांत फक्त १० दिवस पाऊस पडला आहे. मान्सूनचे १२ जूनला आगमन झाल्यानंतर १८ ते २२ जून दरम्यान दमदार पाऊस पडला. परंतु २४ जुलैनंतर पावसाने दडी मारली. अद्यापही पावसाचा पत्ता नाही. यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन असताना ८ जुलै अखेर ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. ही ७६.४३ सरासरी आहे. मागील आठवड्यात १ जुलै अखेर ३ लाख ९७ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. ही ५५.६६ टक्के सरासरी आहे. पावसाने डोळे वटारल्याने जमिनीत पेरणीयोग्य आर्द्रता नाही याचा थेट परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आह. कपाशीचे १ लाख ५७ हजार ८०० हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. ८० हजार ८०५ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली आहे. १७ हजार ६६६ हेक्टर मूग, ४ हजार ८२१ हेक्टर उडीद, ११ हजार ७९६ हेक्टर ज्वारी, ४ हजार ३१३ हेक्टर मका, ५८० हेक्टर भुईमूग पिके आहेत. पावसाअभावी पिकांची रोपे माना टाकत आहेत. जमिनीतील बिजांकुर करपत असल्याने मोड येण्याची शक्यता आहे. सततच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)