२० दुकानदारांचे करारनामे

By Admin | Updated: May 25, 2015 00:23 IST2015-05-25T00:23:03+5:302015-05-25T00:23:03+5:30

पहिल्या टप्प्यात खत्री कॉम्प्लेक्समध्ये ८० रिक्त दुकानांचे परस्पर करारनामे करण्याचा प्रताप तत्कालीन बाजार...

20 shopkeepers contracts | २० दुकानदारांचे करारनामे

२० दुकानदारांचे करारनामे

अमरावती : पहिल्या टप्प्यात खत्री कॉम्प्लेक्समध्ये ८० रिक्त दुकानांचे परस्पर करारनामे करण्याचा प्रताप तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर जयस्वाल यांनी येथील उपनिबंधक कार्यालयात स्वत: दुकानदारांना गाळे वाटपसंदर्भात करारनामे करुन दिले आहे. एका दुकानदारांकडून किमान १८ ते २० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. या संकुलाचा करारनामा सन २०१८ मध्ये संपुष्टात येत असला तरी जयस्वाल यांनी दुकानदारांना पुढील २५ वर्षांसाठी करारनामे करुन दिले आहेत. नेमके कोणत्या दुकानदारांना गाळे वाटप करण्यात आले, त्यांची यादी गोळा करण्यात येत आहे. या सर्व दुकानादारांना भेटून कोणी करारनामे करुन दिले? किती रक्कमेचा व्यवहार झाला? कागदपत्रे कोणती? याची शहानिशा करण्यात आली आहे. हा सर्व अहवाल बाजार व परवाना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केला असून तो सोमवार २५ मे रोजी उपायुक्त चंदन पाटील यांच्या पुढ्यात ठेवला जाणार आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये २३७ गाळे निर्माण करण्यात आले आहे. त्यापैकी १८० गाळे यापूर्वीच वाटप करण्यात आले आहे. उर्वरित गाळे वाटपात झालेला गैरप्रकार शोधून काढणे हे चौकशी अधिकाऱ्यांपुढे आव्हान ठरणारे आहे. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात २२ दुकानदारांना नव्याने परस्पर करारनामे करुन दिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने काही कागदपत्रेदेखील हाती लागल्याची माहिती आहे. या संकुलाचा अवधी २०१८ मध्ये संपुष्टात येत असताना २०४० या सालापर्यंत परस्पर करारनामे करुन देण्याची हिंमत तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी केल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

आयुक्तांनी दिले फौजदारीचे आदेश
आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे १५ दिवसांच्या रजेवर गेले असले तरी त्यांनी खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जाण्यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे सोमवारी अहवाल येताच चौकशी अधिकारी उपायुक्त चंदन पाटील यांना शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवावी लागणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये कोणी बदमाशी केली हे फौजदारी दाखल झाल्यानंतरच कळेल, हे वास्तव आहे.

नियमबाह्य करारनामे झाल्याचे सिद्ध
गत आठवड्यात महापालिका बाजार व परवाना विभागाच्या निरीक्षकांनी खत्री कॉम्प्लेक्समध्ये पाहणी केली असता नव्याने २० ते २२ दुकानदारांसोबत करारनामे झाल्याची कागदपत्रे आढळून आली आहेत. गाळ्यांचे करारनामे करण्यासाठी किती रुपयांच्या व्यवहार झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: 20 shopkeepers contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.