माजी नगरसेवकाच्या घरी २० लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:59+5:302021-01-19T04:15:59+5:30
फोटो पी १८ धारणी चोरी धारणी : शहरातील एका माजी नगरसेवकाचे घर फोडून चोरांनी सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज ...

माजी नगरसेवकाच्या घरी २० लाखांची चोरी
फोटो पी १८ धारणी चोरी
धारणी : शहरातील एका माजी नगरसेवकाचे घर फोडून चोरांनी सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी येथे उघड झाली. चोरांनी आपल्या घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख लांबविल्याची तक्रार त्या माजी नगरसेवकाने धारणी पोलिसांत नोंदविली. त्यानुसार श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या मोठ्या चोरीने धारणी शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथे माजी नगरसेवक आसिफ सौदागर यांचे पाच भावांचे एकत्रित घर आहे. तेथे पाचही भावांची कुटुंबे राहतात. त्या पाच भावांतील एक जावेद सौदागर यांच्या मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम अचलपूर येथे रविवार १७ जानेवारी रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाकरिता सौदागर कुटुंबीय घराला कुलूप लावून रविवारी सकाळी ९ च्या सुमारास वाजता धारणीहून अचलपूरकडे निघाले. दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास मागच्या बाजूच्या दारातून चोर घरात प्रवेशले. त्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख लांबविली.
साक्षगंध कार्यक्रम आटोपल्यानंतर सौदागर कुटुंबीय सोमवारी सकाळच्या सुमारास घरी परतले. त्या वेळी चोरीचा प्रकार उघड झाला. धारणी पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली. आसिफ सौदागर यांच्या माहितीनुसार, चोरांनी त्यांच्या घरातून सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज पळविला. घटनास्थळी ठाणेदार तथा आयपीएस निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अमरावतीहून ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
--------------