मोझरी विकास आराखड्यात २० कोटींची वाढ
By Admin | Updated: July 8, 2014 23:14 IST2014-07-08T23:14:34+5:302014-07-08T23:14:34+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी व महासमाधी असणाऱ्या गुरुकुंज (मोझरी) येथे मूलभूत सुविधांची निर्मिती होण्यासाठी शासनाने १२५ कोटींचा मोझरी विकास आराखडा मंजूर केला होता.

मोझरी विकास आराखड्यात २० कोटींची वाढ
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी व महासमाधी असणाऱ्या गुरुकुंज (मोझरी) येथे मूलभूत सुविधांची निर्मिती होण्यासाठी शासनाने १२५ कोटींचा मोझरी विकास आराखडा मंजूर केला होता. या विकास आराखड्यात आता २० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलै रोजी शिखर बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह तिवस्याच्या आमदार आणि विभागीय आयुक्त बनसोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, उपसचिव हेमंत मालंडकर, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी वाघ, जनार्दन बोथे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी विकास आराखड्यातील विकास कामांसाठी वाढीव १३.८३ कोटींच्या निधीसोबतच अतिरिक्त ७ कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर रेटण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजुर करुन मोझरी विकास आराड्यातील विकास कामे सन २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. या विकास आराखड्यातंर्गत आता मोझरी गावातील पालखी मार्गासाठी २ कोटी रुपये, प्रार्थना मंदिराच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मंजुर केले.