२० अनुकंपाधारक भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला

By Admin | Updated: December 9, 2014 22:42 IST2014-12-09T22:42:58+5:302014-12-09T22:42:58+5:30

महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्याने प्रशासकीय कामकाज हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी नव्याने शासनाकडे पाठविला आहे.

20 compassionate recruitment proposal was sent to the government | २० अनुकंपाधारक भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला

२० अनुकंपाधारक भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला

अमरावती : महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्याने प्रशासकीय कामकाज हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी नव्याने शासनाकडे पाठविला आहे. अनुकंपा तत्त्वावरील जागाभरतीला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आहे.
सध्या महापालिका आस्थापनेवर सुमारे १७०० कर्मचारी कार्यरत आहेत. तर २६०० कर्मचारी सेवानिवृत्त आहेत. मात्र, आस्थापना खर्च हा ५५ टक्क्यांच्या वर असल्याने शासनाकडून नियमित कर्मचारी भरतीला मंजुरी मिळत नाही. परंतु कारभार चालविताना कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुमारे ८०४ पदे रिक्त आहेत. शासनाच्या मंजुरीशिवाय त्या जागा भरणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. परिणामी काही कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाजात सहकार्य मिळावे, याकरिता अनुकंपा तत्त्वावरील २० कर्मचाऱ्यांची भरती करण्याला शासनाने मंजुरी द्यावी, याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे.
हल्ली कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने एका अधिकाऱ्याकडे चार ते पाच विभागाचे कामकाज सोपवून कारभार हाकावा लागत आहे.
या महिन्याच्या अखेरीस आठ ते दहा कर्मचारी सेवानिवृत्त होत असून या कर्मचाऱ्यांकडे असलेली जबाबदारी कुणाकडे सोपवावी? या विवंचनेत प्रशासन आले आहे. नवीन कर्मचारी भरती प्रक्रियेला बंदी तर दर महिन्याला दोन ते तीन कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे नागरी सेवा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने २० अनुकंपाधारकांना सेवेत समाविष्ट करुन घेण्यासाठी शासनाकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच अनुकंपाधारकांना न्याय मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून अनुकंपाधारक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत असून ते महापालिकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याची आशा पल्लवीत झाली आहे. त्याकरिता केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. याबाबत काय निर्णय घेण्यात येतो, याकडे आता अनुकंपाधारकांचे लक्ष लागले आहे. लवकरच निर्णय पारित होऊ शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: 20 compassionate recruitment proposal was sent to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.