२० दिवसांत १८२ अल्पवयीन कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:55+5:302021-04-07T04:12:55+5:30
धक्कादायक, धामणगाव तालुक्याची स्थिती, वाढतोय बेजबाबदारपणा मोहन राऊत धामणगाव रेल्वे : तोंडाला मास्क नाही, सुरक्षित अंतर नाही, ना ...

२० दिवसांत १८२ अल्पवयीन कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक, धामणगाव तालुक्याची स्थिती, वाढतोय बेजबाबदारपणा
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : तोंडाला मास्क नाही, सुरक्षित अंतर नाही, ना दिवसाला जमावबंदी, ना रात्रीला संचारबंदी: शासनाच्या कागदोपत्री सुरू असलेल्या खेळात तालुक्यात २० दिवसांत तब्बल तीन ते सतरा वयोगटातील १८२ अल्पवयीन मुले-मुली कोरोना पॉझिटिव्ह आढळली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
धामणगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ९३५ जणांना कोरोनाची लागण झाली. यात शहरातील ४०१ रुग्ण आहेत. शहरात ३८६, तर तालुक्यात ८६९ रुग्ण बरे झाले. सोमवारपर्यंत ३९ रुग्ण गृह विलगीकरण कक्षात होते. तालुक्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तालुक्यात २० दिवसांत तीन वर्षांपासून तर सतरा वर्षांपर्यंत १८२ अल्पवयीनांना कोरोनाची लागण झाली. १३ मार्चला ३०, १६ मार्च रोजी १४, १७ मार्च रोजी १३, २२ मार्च रोजी १५, २४ मार्च रोजी २०, २ एप्रिल रोजी ११, ३ एप्रिल रोजी ९ अल्पवयीन कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुसऱ्या लाटेत आठ वर्षे, सहा वर्षे, बारा वर्षे आणि सोळा वर्ष वयोगटातील रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याची नोंद तालुका आरोग्य कार्यालयात नोंदविली आहे.
शहरवासीयांचा वाढतोय बेजबाबदारपणा
तालुक्यातील ५५ गावांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना, शहरात ही आकडेवारी कमी होत नाही. शासनाने मिनी लॉकडाऊन घोषित केला. मात्र, याचे पालन होताना दिसत नाही. दिवसा उन्हातही नागरिकांची प्रचंड गर्दी रस्त्यावर पाहायला मिळत असल्याने जमावबंदीचा फज्जा उडाला आहे. रात्रीची संचारबंदी केवळ नावापुरती दिसत आहे. प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याने नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे चित्र धामणगाव शहराचे आहे.
कोट
अल्पवयीनांत कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आता तरी शासनाची नियमावली पाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी सावध होऊन सुरक्षितता पाळली नाही, तर आगामी दिवसात परिस्थिती अधिक गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही.
- हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे
कोट २
शहरात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी आहे. प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घेण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने पावले उचलावीत.
- डॉ. महेश साबळे, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे