आरोग्य विभागाच्या दिमतीला १८ लसीकरण वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST2021-08-21T04:17:36+5:302021-08-21T04:17:36+5:30
जिल्हा परिषद; १४ तालुक्याला मिळणार सुविधा अमरावती : कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत ...

आरोग्य विभागाच्या दिमतीला १८ लसीकरण वाहने
जिल्हा परिषद; १४ तालुक्याला मिळणार सुविधा
अमरावती : कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनाचेवतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला शुक्रवार २० ऑगस्ट रोजी सद्भावना जीवनरथ १८ लसीकरण वाहने मुख्यमंत्र्याच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आले आहेत. ही लसीकरण वाहने १४ तालुक्याला प्रत्येकी याप्रमाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. याकरीता विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे उपलब्ध करून दिली आहेत. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरणासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य विभागाला ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण अत्यंत आवश्यक असल्यामुळे जिल्ह्याला ही वाहने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.