१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी
By Admin | Updated: November 11, 2014 22:31 IST2014-11-11T22:31:17+5:302014-11-11T22:31:17+5:30
जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे

१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी
जिल्ह्यात आजार वाढले : पाणी शुद्धीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
वैभव बाबरेकर - अमरावती
अमरावती : जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्ह्यात विविध आजार वाढत आहेत.
पाणी हे जीवन आहे. अन्नाशिवाय माणूस काही दिवस तग धरु शकतो. मात्र पाण्याशिवाय माणुस जिवंत राहणे कठीणच. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. शासनास्तरावर दूषित पाण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याकरिता विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. मात्र काही वर्षात जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजारही वाढत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात ५ हजारांवर पाण्याचे स्त्रोत आहेत. यापैकी काही पाण्याच्या स्त्रोतातील नमुन्यांची अनुजीव तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत केली जाते. काही वर्र्षांमध्ये प्रयोग शाळेत तपासणीकरिता आलेल्या पाणी स्त्रोतामध्ये १५ टक्क्यांच्यावर पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी पिल्याने सर्वाधिक आजार बळावण्याची शक्यता असते. दूषित पाण्यामुळे जिल्ह्याभरात आरोग्य समस्य उद्भवली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत आॅक्टोबर महिन्यात २ हजार ३६८ पाण्याचे नमुने तपासणीकरिता आले होते. त्यापैकी ४३३ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी १८.२८ असल्याचे प्रयोग शाळेतील तज्ज्ञांनी सांगितले.
२६२ गावांमध्ये दूषित पाणी
जिल्हा परिषेदेच्या पाणीपुरवठा विभागातंर्गत ग्रामीण भागातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८१९ गावे असून त्यापैकी २६२ गावांमधील पाणी स्त्रोताचे नमुने दूषित आढळून आले आहेत.
५ लाख ४० हजार नागरिक पितात दूषित पाणी
अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेच्या अहवालानुसार १८. २८ टक्के पाणी दूषित आढळून आले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ५ लाख ४० हजार नागरिक दूषित पाणी पित असावे, असा अंदाज काही तज्ज्ञांनी काढला आहे.