कुऱ्हा येथे पाणी पुरवठ्यासाठी १८ लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 00:06 IST2017-03-02T00:06:44+5:302017-03-02T00:06:44+5:30
येथील तात्पुरत्या पूरक नळयोजनेच्या अंदाज पत्रकास शासनाद्वारे १८ लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून ....

कुऱ्हा येथे पाणी पुरवठ्यासाठी १८ लक्ष
ग्रामस्थांना दिलासा : यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा
कुऱ्हा : येथील तात्पुरत्या पूरक नळयोजनेच्या अंदाज पत्रकास शासनाद्वारे १८ लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पाणी पुरवठ्याचा हा प्रश्न मार्गी लागला आहे.
येथे १३ व्या वित्त आयोगाचा शिल्लक असलेल्या निधीमधून विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले होते, तसेच कुऱ्हा नजीक असलेल्या जामठी शेत शिवारात विहिर असल्यामुळे जामठी ते कुऱ्हा या ३ कि.मी. अंतराची पाईपलाईन काम निधीअभावी रखडले होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी आमदार यशोमती ठाकूर यांचेकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर सदर योजनेच्या १८ लक्ष रुपयांच्या खर्चाच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे या योजनेला लोकवर्गणीची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. उन्हाळ्याला प्रारंभ होत असताना सर्वत्र पाणी टंचई निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र या योजनेकरिता जलदगतीने निधी मंजूर करण्यात आल्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होऊन ग्रामस्थांना नियमितपणे पाणी पुरवठा होणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
याबाबत १ मार्च रोजी नवनिर्वाचित जि.प. सदस्य पूजा आमले, कुऱ्हा पं.स. सदस्य मंगेश भगोले, उपसरपंच सैय्यद जहांगीर, ग्रामपंचायत सदस्य शहजाद पटेल यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
उन्हाळा तोंडावर आहे. कुऱ्ह्याची पाणी समस्या सोडविण्याची मागणी होती. सातत्याने पाठपुरावा केला. लोकवर्गणीची अट रद्द करून १८ लक्ष रुपये मंजूर झाले. गावकऱ्यांना पाणी मिळेल, याचा आनंद आहे.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा