चार हजार मतदार ठरविणार बाजार समितीचे १८ संचालक
By Admin | Updated: July 22, 2015 00:55 IST2015-07-22T00:55:19+5:302015-07-22T00:55:19+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे.

चार हजार मतदार ठरविणार बाजार समितीचे १८ संचालक
निवडणूक : अमरावती बाजार समितीसाठी राजकीय वातावरण तापले
जितेंद्र दखने अमरावती
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या या बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीचा फै सला सुमारे ४ हजार १७० मतदार करणार आहेत.
सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर या बाजार समितीवर सध्या अशासकीय प्रशासक मंडळ कामकाज पाहत आहेत. त्यामुळे नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी अमरावती व सहकार विभाग यांच्या समन्वयाने बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने केली आहे. बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० जुलैपासून सुरू झाली आहे. मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. ३ आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. बाजार समितीवर एकू ण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत यामध्ये सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून २, हमाल व मापारी मतदारसंघातून १ याप्रमाणे संचालक मंडळ निवडले जाणार आहेत. या संचालक मंडळाच्या भाग्याचा फै सला चारही मतदारसंघ सुमारे ४ हजार १७० मतदार करणार आहेत.
असे आहेत मतदार
सहकारी संस्था मतदारसंघात एकूण १०२९ मतदार आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात ५२०, भातकुलीमध्ये ५०९ तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९१७ मतदार आहेत. यात अमरावती तालुक्यात ५१७ , भातकुलीमध्ये ४०० व व्यापारी व अडते मतदारसंघात ८१० मतदार आहेत. हमाल व मापारी मतदारसंघात ४७९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
दोन तालुक्यातील मतदार
सर्वात मोठी कृ षी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणाऱ्या अमरावती बाजार समितीमध्ये भातकुली आणि अमरावती तालुक्यातील मतदारांचा समावेश आहे. या दोन तालुक्यांतील सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार यात सर्वाधिक आहेत.