कोरोनाकाळात कुटुंबनियोजनाच्या १,७७२ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST2021-01-23T04:13:27+5:302021-01-23T04:13:27+5:30
अमरावती : कोरोनाच्या संसर्ग काळातही जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका ...

कोरोनाकाळात कुटुंबनियोजनाच्या १,७७२ शस्त्रक्रिया
अमरावती : कोरोनाच्या संसर्ग काळातही जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांनी कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले. दरम्यान आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्र मिळून १, ७७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळातसुध्दा शहरी व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कुटुंब नियोजनाचे सर्वेक्षण केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण व प्राथमिक औषधोपचार केला. राष्ट्रीय कार्यक्रम राबविताना लाभार्थींचा विश्वास संपादन करून त्यांना कुटुंब नियोजनाचे फायदे समजावून सांगितले व शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित केले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा संवेदनशील विषय आहे. त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व भावनिक असे दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर होत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम गणला जातो.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांत पार पडल्या. त्यात पुरुष ५३ व स्त्री शस्त्रक्रिया १७१९ अशा एकूण जिल्ह्यात १७७२ शस्त्रक्रिया झाल्या. सगळीकडे कोविड-१९ ची कामे सांभाळून अगदी जोमाने आरोग्य विभाग कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक कर्मचारी व अधिकारी उद्दिष्ट पूर्तीचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता कुटुंब कल्याण विभागाचे प्रशासकीय अधिकारी सुभाष सिडाम, आरोग्य सहायक कुंभलवार, आरोग्य सेविका प्रीती तसरे हे काम सांभाळत असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. सदर शस्त्रक्रिया शिबिराचे कामकाज वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहेत.
कोट
दैनंदिन कार्याचा वाढता ताण व विपरीत परिस्थितीवर मात करून आरोग्य विभागाने अधिकारी व कर्मचारी आशा सेविका काम करीत आहे. हा उपक्रम लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. लाभार्थिंचे मतपरिवर्तन करणे व शस्त्रक्रियेसाठी तयार करणे, हा त्यांच्या परिश्रमाचाच एक अविभाज्य घटक आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी