चौऱ्यामल गावाचा १७ वर्षांचा वनवास संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:14+5:302021-06-09T04:16:14+5:30
स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत ...

चौऱ्यामल गावाचा १७ वर्षांचा वनवास संपला
स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद
चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौऱ्यामल गावाचा पाणीपुरवठा अखेर १७ वर्षांनंतर सुरळीत झाला आहे. आदिवासींनी हा पाणिलढा ‘लोकमत’च्या माध्यमातून जिंकला असून, पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन केलेले कार्य आदिवासींमध्ये आनंद व्यक्त करणारे ठरले आहे.
एखाद्या चुकीच्या कामाचा फटका कसा बसतो, याचा प्रत्यय तालुक्यातील चौऱ्यामल गावातील आदिवासींना एक-दोन नव्हे, तब्बल सतरा वर्षे आला. गावापासून अडीच किलोमीटरवर शहानूर धरणाच्या तळाशी पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक असलेला विद्युतपुरवठा चुकीच्या पद्धतीने केला गेल्यामुळे उशाशी धरण असतानाही गाव मात्र तहानले असल्याचा हा प्रकार होता. ‘लोकमत’ने यासंदर्भात लोकदरबारात वृत्त प्रकाशित करून चौऱ्यामलवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला.
बॉक्स
विद्युत पुरवठ्याची होती मुख्य समस्या
चौऱ्यामल गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. अडीच किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणीसुद्धा आहे. परंतु, टाके भरण्यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा महावितरणच्या कृषी फीडरवरून करण्यात आला होता. पावसाळा व इतर काही महिने हे फीडर बंद ठेवण्यात येते तेव्हा गावातील पाणीपुरवठाही बंद राहत होता. आदिवासींना नदी-नाल्याचे पाणी अडीच किलोमीटरपर्यंत पायपीट करीत भरावे लागत होते.
बॉक्स
डीपीसीतून १६ लक्ष ,समस्या दूर
जिल्ह्याच्या डीपीसी बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आ. राजकुमार पटेल, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच राजेश जावरकर, सचिव ऋषीकेश राहाटे यांच्याकडे चौऱ्यामल पाणीपुरवठ्यासंदर्भात १६ लक्ष रुपये खर्चाचा मुद्दा मांडला होता. हा निधी मंजूर करण्यात आला व स्वतंत्र, नवीन विद्युत पुरवठा तेथे करण्यात आला. आता गावकऱ्यांना पाणी मिळू लागले आहे
कोट
आकी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चौऱ्यामल गावाच्या पाणीपुरवठ्याला १७ वर्षांपासून कृषी फीडरवरून वीजपुरवठा होत होता. पाणी असूनसुद्धा वीजपुरवठा नियमित नसल्यामुळे पाणीटंचाई भासत होती. परंतु, आता स्वतंत्र डीबी मिळाल्याने २४ तास पाणी मिळत आहे.
ऋषीकेश राहाटे, ग्रामसचिव, आकी