१७ पर्यंत मतदार यादीवर नोंदवा आक्षेप
By Admin | Updated: January 4, 2017 00:20 IST2017-01-04T00:20:05+5:302017-01-04T00:20:05+5:30
जिल्हापरिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०१७ या दिनांकावर प्रसिद्ध केलेली विधानसभा निवडणुकांची यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

१७ पर्यंत मतदार यादीवर नोंदवा आक्षेप
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषद
अमरावती : जिल्हापरिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०१७ या दिनांकावर प्रसिद्ध केलेली विधानसभा निवडणुकांची यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या यादीवर १२ ते १७ जानेवारीदरम्यान हरकती नोंदविल्या जाणार आहेत. यादी बिनचूक व्हावी व यामधील मुद्रण दोष निकाली निघालेत यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
जिल्ह्यात महापालिका वगळता १३ लाख ८१९ मतदार आहेत. दरम्यान नागरिकांनी या यादीचे अवलोकन करून आक्षेप नोंदविल्यास यादी अचूक होणार आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी व्ही.सी.द्वारे पूर्वतयारीचा आढावा घेतला. यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना ही अचूक मतदारयादीसंदर्भात आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये काहींची नावे गहाळ झाल्याने नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत याद्या बिनचूक व्हाव्यात, यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेला महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी सिद्धभट्टी उपस्थित होते.
२२ प्रभागांत विभागवार यादी
महापालिकेत सध्या ५ लाख ५२ हजार मतदार आहेत. यामध्ये आणखी २० ते २२ हजार मतदार नव्याने जुळणार आहे. शहरात चार सदस्यीय प्रभाग प्रणालीनुसार संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ती संभाव्य उमेदवार व राजकीय पक्षांनी डाऊनलोड करावी. १२ ते १७ जानेवारीदरम्यान आक्षेप नोंदवावे, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले.
‘त्या’ शिक्षकांवर होणार फौजदारी
अमरावती तालुक्यात २५७ बोगस मतदारप्रकरणी चौकशी केली असता चार शिक्षकांनी जन्मतारखेचे बोगस दाखले दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी या नात्याने आपण स्वत: त्या शिक्षकांवर फौजदारी दाखल करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.