१.६८ कोटींच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 23:58 IST2016-08-28T23:58:25+5:302016-08-28T23:58:25+5:30
महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी बेंचला पाय फुटले आहेत.

१.६८ कोटींच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार !
महापालिकेतील गौडबंगाल : लाखोंचा मलिदा कुणाच्या खिशात ?
अमरावती : महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी बेंचला पाय फुटले आहेत. अवघ्या वर्षभरात तब्बल १.६८ कोटी रुपये खर्च करुन शहरात १६७० लोखंडी बेंच लावल्याचा दावा भांडार विभागाने केला आहे. तथापी या ‘कोंटीच्या उड्डाणा’मध्ये लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा स्पष्ट आरोप होत आहे. भांडार विभागासह यंत्रणेतील एका उच्चपदस्थाने लेखा विभागाशी संगनमत करून उखळ पांढरे करून घेतले आहे.
शहरात १,६७० लोखंडी बेंच लावल्याचा दावा करणाऱ्या भांडार विभागाने त्या लोखंडी बेंचेसचा स्थळनिहाय हिशेब द्यावा, असे आव्हान केल्यानंतरही या विभागाने पाळलेले मौन संशयाला वाव देणारे आहे. मर्जीतील कंत्राटदाराला हाताशी घेऊन काही मोजक्या लोकांनी लोखंडी बेंच खरेदीत कोट्यवधींचा मलिदा लाटला आहे. प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी लोखंडी बेंच पुरविण्यात यावे, अशी मागणी एका नगरसेवकाने नोंदविल्यानंतर या भ्रष्टाचाराच्या मालिकेस सुरुवात झाली.
भांडार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०१५ ला तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांनी लोखंडी बेंच खरेदीच्या दरकराराला मंजुरी दिली. वर्षभरासाठी हा दरकरार करण्यात आला. स्थानिक युनिव्हर्सल फेब्रिकेशन या निविदाधारकास कंत्राटदार म्हणून नेमण्यात आले. त्याचेसोबत १०,९४२ रुपये प्रति बेंच असा करार करण्यात आला. त्यावेळी २५ नगांची मागणी होती. सुरुवातीला तत्कालीन आयुक्तांनाही या एकंदरित दरकराराबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे पुरविण्यात येणारे ते बेंच नेमके कसे असावेत आणि कसे आहेत, याबाबत जाणून घेण्याची तसदी भांडार विभागाने घेतली नाही.
तत्कालीन आयुक्तांना अंधारात ठेवत आणि वर्कआॅर्डर आणि नस्तीवर स्वाक्षरी आणि मंजुरी न घेता भांडार विभागाने परस्परच युनिव्हर्सल फेब्रिकेशनला बेंच पुरविण्याची आॅर्डर दिली. मागणीनुसार संबंधिताने बेंच पुरविल्याचा दावा केला जात असला तरी त्या दाव्याला भक्कम पुराव्याची जोड नाही. आयुक्तांना अंधारात ठेवत आणि काहींना आतल्या गोटात घेत कागदावरच ही खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान बेंच खरेदीमध्ये गौडबंगाल असल्याच्या चर्चा व्यापक झाल्यानंतर दरकराराची ही फाईल आयुक्त गुडेवार यांच्यासमोर ठेवण्यात आली तेव्हा गुडेवारांनी युनिव्हर्सल फेब्रिकेशनने दिलेल्या दरांवर आक्षेप नोंदविला. एखाद्या लोखंडी बेंचची किंमत तब्बल ११ हजार कशी असू शकते, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर तेच बेंच हा कंत्राटदार ८५०० रुपयांमध्ये देण्यास तयार झाला. १९ जानेवारी २०१६ ला यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आलेल्या लोखंडी बेंचच्या मागणीचे दस्तवेज गुडेवारांच्या नजरेखालून गेलेत. मात्र, युनिव्हर्सल फेब्रिकेशन या कंत्राटदाराला पुढे अभय देण्यात आले. (प्रतिनिधी)
येथे झाला भ्रष्टाचार
मूळ दरकरारामध्ये १०९४२ रुपये प्रतिलोखंडी बेंच असा करार होता. त्यानंतर तोच कंत्राटदार तेच बेंच पुढे ८५०० रुपयांमध्ये देणार असल्याची नस्तीमध्ये नोंद आहे. एका बेंचमागे सुमारे २५०० रुपये कमी केल्यानंतर तो कंत्राटदार आधीच्या स्पेसिफिकेशननुसारच बेंच देतो आहे किंवा नाही, याची तपासणी करणे बंधनकारक असताना त्याकडे अर्थपूर्ण आणि सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. ८५०० रुपये दराने बेंच पुरविले जात असताना भांडार विभागासह अन्य यंत्रणेने तपासणीची तसदी घेतली नाही. कंत्राटदाराच्या हातात हात घालून आणि गोल्डन गँगमधील म्होरक्याशी संधान बांधून शहरात तब्बल १ कोटी ६७ लाख ८७ हजार ९४१ रुपयांच्या बेंच खरेदीत मोठा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आता जाहीरपणे होऊ लागला आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
लोखंडी बेंच खरेदीमध्ये आर्थिक अनियमितता नाकारता येत नाही, यात काही बड्याचा समावेश आहे. या अनुषंगाने प्रकरणातील वास्तव उघड करण्यासाठी स्थायी समितीमध्ये प्रस्ताव ठेवला आहे. या गैरव्यवहाराच्या मुळापर्यंत आपण जाणार आहोत.
- राजू मसराम, नगरसेवक