१६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर
By Admin | Updated: January 4, 2015 23:03 IST2015-01-04T23:03:43+5:302015-01-04T23:03:43+5:30
जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या

१६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर
रबी हंगाम : अंजनगाव तालुक्यात ३६ टक्केच पेरणी
अमरावती : जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र ८९ टक्के आहे. रबी पेरणीचा कालावधी संपल्यागत असल्याने १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर राहणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पेरणीपासून पावसाने दीड महिना दडी मारली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली. याचा परिणाम होऊन रबी हंगामाची पेरणी दोन महिने माघारली. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात व ८०० ते ८५० मि. मी. पावसाची सरासरी असायला पाहिजे परंतु यंदा ५५० मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे रबी हंगाम पेरणीसाठी जमिनीत पुरेसी आर्द्रता नसल्याने हरभऱ्याची उगवणशक्ती कमी झाली. जिल्ह्यात ९० टक्के पेरणीक्षेत्रात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी केल्या जाते. मात्र हलक्या प्रतिच्या जमिनीत पुरेश्या आर्द्रतेमुळे रबीची पेरणी झालेली नाही. परिणामी असे १२ हजारावर हेक्टर क्षेत्र नापेर राहीले आहे.
या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. मात्र रबी हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी १५ नोव्हेंबर पावेतो असतो त्यामुळे आता कालावधी संपल्यानंतर हरभरा पेरणी शक्य नाही. त्यामुळे या पाऊसाचा फायदा पेरणी झालेल्या हरभरा, गहू पिकाला होणार आहे.
३१ डिसेंबरपर्यंत धारणी तालुक्यात १४,६७६ हेक्टर, चिखलदरा ४४६०, अमरावती ८०९०, भातकुली ७९४४, नांदगाव खंडेश्वर ९७६०, चांदूररेल्वे ६१६८, तिवसा ९१७६, मोर्शी ७८६६, वरूड ७३२४, दर्यापूर २०५९२, अंजनगाव ६६७६, अचलपूर ५६२७, चांदूरबाजार ९६२२, धामणगाव १३,७२७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी आटोपली आहे. रबीचा हंगाम दोन महिने माघारल्याने याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होणार आहे. (प्रतिनिधी)