धामणगाव तालुक्यात १५ गावे ठरली ‘कोरोना हॉट स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST2021-05-19T04:12:52+5:302021-05-19T04:12:52+5:30
पान २ चे लीड धामणगाव रेल्वे : घराच्या आवारातच लग्न सोहळा पार पाडला. वृद्ध व्यक्ती मृत झाली. ...

धामणगाव तालुक्यात १५ गावे ठरली ‘कोरोना हॉट स्पॉट’
पान २ चे लीड
धामणगाव रेल्वे : घराच्या आवारातच लग्न सोहळा पार पाडला. वृद्ध व्यक्ती मृत झाली. परंपरा आहे म्हणून तेरवी केली. लॉकडाऊन, त्यात शाळा बंद असल्याने अनेकांनी नातेवाइकांना बोलावून त्यांचे पाहुणपण केले. अशा नानाविध कारणांमुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक वाढला. परिणामी, तब्बल १५ गावे ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे रुग्ण धामणगाव तालुक्यात आहेत. दररोज ५० च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. एखाद्या गावात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर या गावात ग्रामसेवक, तलाठी, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील, सरपंच व उपसरपंच कर्मचारी यांच्या पुढाकाराने गावात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तातडीने कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करतात. त्यातून रोज नवनवे आकडे समोर येत आहेत.
जिल्ह्यात ९ मेपासून लॉकडाऊन आहे. दोन आठवड्यांच्या या कडक निर्बंधातील अकराव्या दिवसांपर्यंत काही ग्रामस्थ त्याचे पालन करीत नसल्याने तालुक्यातील कोरोना संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही. तालुक्याची ही स्थिती राहिल्यास तिसरा लाटेचा धोका या तालुक्याला अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत वैद्यकीय यंत्रणेने व्यक्त केले आहे.
या गावात सर्वाधिक संसर्ग
तालुक्यातील सोनेगाव खर्डा, हिरपूर, आजनगाव, जुना धामणगाव, निंभोरा राज, निंभोरा बोडका, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, वाढोणा, मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी, नायगाव, झाडा, पिंपळखुटा, देवगाव ही गावे ‘कोरोना हॉट स्पॉट’ ठरली आहेत. या गावांत आतापर्यंत ५० पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या गावात लग्न समारंभ, तेरवी, पाहुणपण आलेल्या व्यक्तींकडून कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.
शहरातील ‘सैराट’वर आता भरारी पथकाची नजर
धामणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या नेतृत्वात शहरात सकाळी ७ पासून रात्री १० पर्यंत भरारी पथके फिरून अथक परिश्रम घेत आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे रस्त्यावर फिरणाऱ्यांना त्यांच्या घरी असलेल्या कुटुंबाची आठवण करून दिली जात असली तरी कधी बँकेच्या नावाने, तर कधी मेडिकलच्या औषधासाठी फिरणाऱ्याची संख्या शहरात अधिक आहे. नगर परिषदेच्या भरारी पथकाने आता अशा सैराटांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
कोट
तालुक्यात अनेक गावे ‘कोरोना हॉट स्पॉट’ ठरली आहेत. आजही काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. कट्ट्यावर बसलेले असतात. कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. आता स्वतःला स्वतःची काळजी घेण्याची वेळ आली आहे.
डॉ. हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे