बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ पथके
By Admin | Updated: June 8, 2017 00:09 IST2017-06-08T00:09:57+5:302017-06-08T00:09:57+5:30
बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, ...

बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ पथके
मृग नक्षत्रास सुरूवात : बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, यासाठी यंदा तालुकास्तरावर १४ व जिल्हास्तरावर एक असे एकूण १५ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरुन या पथकावर नियंत्रण ठेवले जात असल्याची माहीती कृषी विभागाने दिली.
गुरुवारपासून मृग नक्षत्रास सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी होणार आहे. यासाठी किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे. यंदा बियाण्यांची टंचाई नसली तरी दरवर्षीप्रमाणे बोगस बियाणे कंपन्याचा शिरकाव पेरणीच्या काळात होतो. हे हेरून कृषी विभाग कामाला लागला आहे. त्याअनुषंगाने कृषी केंद्रधारकांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. बियाण्यांचा काळाबाजार अथवा अप्रमाणीत बियाणे, एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत विक्री झाल्याचे निर्दशनात आल्यास त्या दुकानाचा परवाना तत्काळ निलंबित करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधीकारी उदय काथोडे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना बियाण्यांविषयी शंका आल्यास किंवा दुकानदार अधिक दराने विक्री करीत असल्यास १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सोयाबीनसाठी तीन लाख २३ हजार ३०० हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. एक लाख २१हजार ५०० व्किंटल बियाणे लागणार आहे. एक लाख ९४ हजार हेक्टर सुधारीत व संकरीत कपासीचे क्षेत्र राहणार आहे. पाच हजार ८०० क्विंटल बियाणे लागणार आहे. यंदाच्या हंगामासाठी एक लाख लाख ४० हजार ९८९ व्किंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये ६८ हजार ८४९ व्किंटल खासगी, ७२ हजार १४० सार्वजनिकरित्या उपलब्ध होणार आहे. तर ७६ हजार ४० व्किंटल बियाणे महाबीजव्दारा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
टॅग,लेबल पाहूनच करावी बियाण्यांची खरेदी
बियाण्यांच्या पिशवीवरील टॅग बघुनच बियाणे खरेदी करावे. या टॅग वरील लॉट नंबरवरून त्या बियांण्याची विक्री करणारे राज्य कोणते, याची माहीती मिळते. त्यामुळे फसवणूक टाळता येते. लेबल नसलेल्या बियाण्यांचे पाकीट खरेदी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.