१५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला अंगलट
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:22+5:302016-04-03T03:49:22+5:30
पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेच्या बंदोबस्तादरम्यान १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा अंगलट आला.

१५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला अंगलट
वर्षभराची वेतनवाढ रोखली : नियंत्रण कक्षातील एएसआय निलंबित
अमरावती : पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेच्या बंदोबस्तादरम्यान १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा अंगलट आला. कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी त्यांची एक वर्षांची वेतनवाढ रोखली आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील कामकाजात हयगय केल्याच्या कारणावरून एका एएसआयला निलंबितसुद्धा करण्यात आले आहे.
पोलीस भरती प्रक्रियेला पहाटेच सुरुवात होत असल्यामुळे अर्धातास आधीच तेथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागतात. पोलीस भरती प्रक्रिया शिस्तबध्द व अत्यंत पारदर्शक व्हावी या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून सर्व व्यवस्था व वातावरण निर्णाण केले आहे. यादरम्यान कोणताही पोलीस कर्मचारी नियमांचे व सुचनाचे उल्लघंन करीत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. त्यानंतर तिन दिवसांत १५ पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामध्ये लेटलतीफ व कर्तव्यात झोपा काढत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. लेटलतीफमध्ये एपीआय जाधव, पीएसआय मीश्रा, एसएसआय राधेलाल नंदवंशी, आशिष इंगळेकर, सचिन मोहोड, जुगलकिशोर यादव, विकास गुडधे, उमेश हरणे, प्रवीण इखार यांचा समावेश असून पोलीस गस्तीदरम्यान संगणक कक्षात कर्तव्यावर झोपा काढणाऱ्यांमध्ये अमर पटेल, देवीदास उदे, सतीश बोने व अमोल यादव यांचा समावेश आहे.
नियंत्रण कक्षातील एएसआय निलंबित
३० मार्च रोजीच्या रात्रीला एक अपघात घडला होता. एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर फोन करून माहिती दिली. मात्र, तब्बल अर्धा तास घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी नियंत्रण कक्षात एएसआय रवींद्र राऊत कर्तव्यावर होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ गाढवे यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.
आजपासून मुलीची पोलीस भरती प्रक्रिया
२९ मार्चपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली असून हजारो विद्यार्थ्यांनी विविध चाचण्या दिल्या आहेत. त्यापैकी काही उमेदवार पात्र ठरले असून त्यांच्या संपूर्ण चाचण्या शनिवारी घेण्यात आल्या आहेत. शनिवारी ७५० उमेदवारांना बोलाविण्यात आले असून त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्यात. त्यातच सात माजी सैनिकांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्यात. आता रविवारपासून महिला पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.