दीड लाख लिटर पाणी शौचालयात

By Admin | Updated: May 6, 2015 00:35 IST2015-05-06T00:35:58+5:302015-05-06T00:35:58+5:30

घरातील पाण्याची टाकी भरली असताना पाणी वाया जाणे, पाणी भरल्यानंतर नळ सुरूच ठेवणे तर एक दिवसाआड नळ

1.5 lakh liters water in the toilet | दीड लाख लिटर पाणी शौचालयात

दीड लाख लिटर पाणी शौचालयात

असहकार्य : चांदूरबाजारात २४ तास पाणीपुरवठा योजना रखडली
सुरेश सवळे चांदूरबाजार
घरातील पाण्याची टाकी भरली असताना पाणी वाया जाणे, पाणी भरल्यानंतर नळ सुरूच ठेवणे तर एक दिवसाआड नळ आल्यानंतर घरातील शिळे पाणी बाहेर फेकणे अशा विविध प्रकारातून शहरवासी दर दिवशी २ लाख लिटर पाणी वाया घालवितात. यातील १ लाख ३५ हजार लिटर पाणी शौचालयात सोडत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ ही म्हण शहरवासीयांनी कागदावरच ठेवली असताना दुसरीकडे शहरात गेल्या ३ वर्षापासून २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी नळावर मीटर लावण्याची योजनाही रखडली आहे.
चांदूरबाजार न. प. हद्दीत १८ हजार ७६३ नागरिकांचे वास्तव्य आहेत. यात वेगळे अंदाजित शहरात शिक्षण घेण्यासाठी व रोजंदारीच्या माध्यमातून २०० कुटूंब भाड्याने राहतात. यांना शहरातील न. प. पाणी पुरवठा विभागात असलेल्या ४ लाख २० हजार लिटर, ३ लाख लिटर व एक लाख लिटर क्षमता असलेल्या तीन टाक्यांमधून अर्ध्या-अर्ध्या शहराचे दोन भाग पाडून दिवसाआड पाणी पुरवठा कमी होतो. असे असले तरी नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे.
२४ तास पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा
तेराव्या वित्त आयोग योजनेंतर्गत शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा व्हावा म्हणून ५६ लक्ष रूपये खर्चाची घरोघरी सर्व नळधारकांना मोफत जलमापक लावण्याची योजना कार्यान्वीत करण्यात आली. ३२८० नळधारकांपैकी केवळ १७०० नळ धारकांच्या नळावर मीटर बसविण्यात आले. मात्र काही कर्मचारी व तत्कालीन मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या असहकार्यामुळे ही योजना मधातच थांबली. जलमापक बसविण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवकानेच जिल्हाधिकाऱ्याकडे केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर एसडीओकडे चौकशी अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले.

पाणीपुरवठ्याची दोन विभागात विभागणी
शहरात ३२८० नळधारक आहेत. पाणी पुरवठ्यासाठी शहराचे दोन विभाग पाडल्या गेले. एक दिवसाआड शहराच्या दोन्ही विभागात पाण्याचा पुरवठा होतो. ३२८० कुटुंबापैकी ३ हजार कुटुंबाकडे शौचालय आहेत. त्यामुळे शहराच्या एका विभागात १५०० कुटुंबाकडे शौचालय आहे. या कुटुंबांना १४ लक्ष लिटरचा पाणी पुरवठा होतो. एका कुटुंबात वापराचे पाणी भरल्यानंतर पाणी घेणे बंद केल्या जात नाही तर ते पाणी शौचालयात सोडल्या जाते. एका कुटुंबाने अशाप्रकारे ६ बकेटा पाणी सोडले तरी ९० लिटर होते. अशाप्रकारे १५०० कुटुंबाचा हिशेब केला तर १ लाख ३५ हजार लिटर पाणी शौचालयात सोडले जाते हे नाकारता येणार नाही.

९५ लाखांची थकबाकी
भरण्यातही उदासिनता
एकीकडे नागरिकांनी नळावर मीटर बसविण्यास नकार दिला तर ज्यांनी बसविले त्यातील काहींनी हे मीटर काढून टाकली त्यामुळे २४ तास पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर दुसरीकडे नागरिकांना मुबलक व वेळेत पाणी मिळून सुद्धा नागरीक पाणी बिलांचा भरणा करीत नसल्यामुळे थकबाकीत वाढ झाली आहे. सद्यपरिस्थितीत ५० लक्ष रूपये थकीत तर चालू बिलाची ४५ लक्ष रूपये मागणी अशी ९५ लक्ष रूपये थकीत आहे. या रकमेच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना १०-१० वेळा नळधारकाकडे चकरा माराव्या लागतात. तरी बिलाचा भरणा केल्या जात नाही.

शिरजगाव ग्रामपंचायतकडेही
१५ लक्ष रूपये थकीत
चांदूरबाजारला होणारा पाणी पुरवठा पूर्णा प्रकल्पातून होतो व यापोटी पालिका प्रशासन पाटबंधारे विभागाला महिन्याकाठी ३० हजार रूपये देते. याच योजनेंतर्गत शिरजगाव बंड ग्रामपंचायतला पाणी पुरवठा होतो. करारानुसार शिरजगाव बंड ग्रामपंचायतने पालिकेला महिन्याकाठी ४२ हजार रूपये द्यावे असा करार आहे. मात्र त्यातही शिरजगाव बंड ग्रामपंचायतकडे पालिकेचे १५ लक्ष रूपये घेणे आहे. या योजनेच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ९ लक्ष रूपये पालिकेचा खर्च आहे. वेळीच या गंभीर विषयावर लोकप्रतिनिधी व नागरिकांनी लक्ष केंद्रित केले नाही तर पाणी पुरवठाचे भविष्य अंधातरी राहणार एवढे निश्चित!

मीटर बसविणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यासाठी फेब्रुवारी १५ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला होता. मात्र त्याला विरोध झाल्यामुळे पुढील सभेत चर्चेसाठी ठेवण्याचा निर्णय झाला.
- शुभांगी देशमुख,
नगराध्यक्ष.

या योजनेची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात आली. त्याला त्यावेळी सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शविली. त्यानंतर मात्र काही नगरसेवकांनी हेतुपुरस्पर नागरिकांना नळावर मीटर लावू नये म्हणून उचकावले.
- मुजफ्फर हुसेन, सभापती
पाणी पुरवठा

२७ बाय ७ पाणी पुरवठा योजना नागरिकांच्या फायद्याची असतानासुद्धा नागरिकांनी नळावर मीटर बसविण्यास नकार दिला त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत. नळधारकांनी या योजनेला सहकार्य करावे यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
- अ. रहेमान शे. इब्राहीम
गटनेता, न. प.

वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात सुजल निर्मल योजना अमलात येणार असल्यामुळे नवीन पाईपलाईन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे नळ मीटर बसविणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ देता येणार नाही.
- डॉ. मेघना वासनकर
- मुख्याधिकारी.

शौचालयात पाण्याचा अपव्यय झाला तर भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकानुसार कंत्राटदाराला देयक दिल्या गेले असते तर घोळ निर्माण झाला नसता. पहिल्या करारानुसार ३० मार्च २०१३ पर्यंत मीटर लावण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मीटर बसविल्यानंतर त्याचे रिडींग घेण्याकरिता मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. - गोपाल तिरमारे, सभापती आरोग्य, शिक्षण समिती.

Web Title: 1.5 lakh liters water in the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.