पीककर्जाच्या रकमेत १५ टक्क्यांनी वाढ
By Admin | Updated: October 8, 2016 00:08 IST2016-10-08T00:08:11+5:302016-10-08T00:08:11+5:30
पुढील वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पीककर्जाच्या रकमेत सरासरी १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे.

पीककर्जाच्या रकमेत १५ टक्क्यांनी वाढ
दिलासा : राज्य समितीचे दर जिल्हा समितीला बंधनकारक
अमरावती : पुढील वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पीककर्जाच्या रकमेत सरासरी १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पीककर्ज आढावा समितीत हा निर्णय झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. याविषयीचा शासन अध्यादेश लवकरच जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आगामी खरीप व रबी हंगामात विविध पिकांची कर्जमर्यादा ठरविण्यासाठी राज्यस्तर पीककर्ज आढावा समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये येत्या हंगामात शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी, विविध पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च व हेक्टरी सरासरी उत्पादन आणि बाजारभावावर आधारित विविध पिकांची कर्जमर्यादा ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात पुढील वर्षासाठी पीककर्जाचे दर ठरविण्यासाठी राज्यस्तर पीककर्ज आढावा समितीची बैठक होते.
एप्रिलपासून कर्ज वाटपाला सुरूवात
अमरावती : त्यानंतर सर्व जिल्हा बँकांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हा पीककर्ज आढावा समितीची बैठक घेण्यात येते. यामध्ये पीक पद्धतीनुसार संबंधित बँकांना राज्यस्तर समितीने ठरवून दिलेल्या पीककर्ज मर्यादेच्या १५ टक्क्यापर्यंत पीककर्जात वाढ करण्याचे अधिकार आहेत. मात्र, राज्यस्तर समितीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कर्जाचे दर जिल्हा समित्यांना कमी करता येणार नाहीत, प्रतिहेक्टरी खर्च व उत्पादन, सध्याचे बाजारभाव, सरासरी पीकक्षेत्र अशा सर्व बाबी गृहित धरून पीककर्ज दर ठरविण्यात येतो. यामध्ये खरीप, रबी, उन्हाळी पिके, भाजी, फळे व फुले यासर्व पिकांचा विचार केला जातो व कर्जवाटपाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात करण्यात येते. (प्रतिनिधी)