१४ व्या वित्त आयोगाचे १७.९५ कोटी आले
By Admin | Updated: August 3, 2015 00:12 IST2015-08-03T00:12:41+5:302015-08-03T00:12:41+5:30
आॅगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून जुलै महिन्याचा वेतनाचा प्रश्न कायम आहे.

१४ व्या वित्त आयोगाचे १७.९५ कोटी आले
अमरावती : आॅगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून जुलै महिन्याचा वेतनाचा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे उत्पन्नाचे साधन आटत चालल्याने महापालिकेचा कारभार चालविणे कठीण होत आहे.
राज्य शासनाने १४ व्या वित्त आयोगातून महापालिकेला १७.९५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. हे अनुदान कोणत्या विकास कामांवर खर्च करावे, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली नाहीत. परंतु नव्याने शासन आदेश येईल, असे शासनाने एका पत्राद्वारे कळविले आहे. १७.९५ कोटी रुपये मंजूर झाल्याचे पत्र प्र्नाप्त झाले असून लवकरच ही रक्कम तिजोरीत जमा होणार आहे.
आयुक्तांच्या समान निधी वाटपाचे काय ?
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी १३ वा वित्त आयोगाचे १९ कोटी तर मूलभूत सुविधा विशेष अनुदानाचे २.४५ कोटी रुपयांतून ९२ नगरसेवकांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक सदस्यांना २५ लाख रुपये याप्रमाणे हे अनुदान वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र या अनुदानावर डोळा ठेवून आ. रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. नगरविकास विभागाच्या सचिवाकडून याबाबत नवीन आदेश प्राप्त झाले नाही. परंतु आ. राणा यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शेऱ्यानुसार नक्कीच काहीतरी वेगळे होईल, असे बोलले जात आहे.
निधी वाटपावर स्थगितीचे पत्र
महापौर चरणजितकौर नंदा यांच्या निर्णयानुसार आयुक्तांनी प्रत्येकी नगरसेवकांना २५ लाख रूपये शासन अनुदानातून वितरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयावर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्थगिती मागितली आहे त्यामुळे अनुदान वाटपावरून नगरसेवका विरुद्ध रवी राणा, असा संघर्ष उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.