झेडपीच्या १४७ मुुलांचे तर मुुलींच्या ७४ शाळा शौचालयाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:32+5:302021-09-19T04:13:32+5:30
अमरावती : ग्रामीण भागातील प्रगतीचे द्योतक म्हणून शिक्षणाची गंगा जिल्हा परिषदेने गावागावात पाेहोविली. इमारती बांधल्या, वर्ग सुरू झालेत. परंतु ...

झेडपीच्या १४७ मुुलांचे तर मुुलींच्या ७४ शाळा शौचालयाविना
अमरावती : ग्रामीण भागातील प्रगतीचे द्योतक म्हणून शिक्षणाची गंगा जिल्हा परिषदेने गावागावात पाेहोविली. इमारती बांधल्या, वर्ग सुरू झालेत. परंतु शाळेच्या मूलभूत सुविधा अजूनही पूर्णत्वास आल्या नाहीत. शिक्षण विभागाकडूनच मिळालेल्या आकडेवारीनुसार १५८३ जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांतील १४७ मुलांचे, तर ७४ मुलींच्या शाळेत शौचालय नाहीत. यासोबतच ३२४ शाळांमधील शौचालयांचा वापर होत नसल्याची माहिती शिक्षण विभागात्या अहवालातून प्राप्त झाली.
काही वर्षात जिल्हा परिषदेची नवीन शाळा सुरू झाली नाही. परंतु दरवर्षी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर आदींच्या माध्यमातून शाळांसाठी निधी उपलब्ध होतच असतो. परंतु या निधीचा उपायोग मृूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे आरटीई कायद्यानुसार मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची तरतूद आहे. अशातही जिल्ह्यात २२१ शाळांत शौचालये नाहीत. ही बाब खटकणारी आहे. शाैचालय नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणे आवश्यक आहे.
बॉक्स
३२४ शौचालये वापरण्यायोग्य नाही
जिल्हा परिषदेच्या शाळांतील ३२४ शाैचालये वापरण्यायोग्य नसल्याची माहिती आहे. काही शाैचालय मोडकळीस आले आहेत. कुठे घाण पसरली असल्याने त्याचा वापर होत नाही. यामध्ये २१७ मुलांचे, तर १०७ मुुलींच्या शौचालयाचा समावेश आहे.
कोट
जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालयास मूलभूत सुविधा पुरविण्यावर जिल्हा परिषदेचा भर आहे. सर्व शिक्षा अभियान व अन्य शासनाच्या उपलब्ध होणाऱ्या निधीतून वर्गखोल्या व शौचालय बांधकामाला प्राधान्य दिले जाते. यापुढे ज्या ठिकाणी शौचालय नाही, अशा शाळेत शौचालये बांधण्यास प्राथमिकता दिली जाईल.
- सुरेश निमकर,
सभापती, शिक्षण समिती जि.प.
बॉक्स
तालुकानिहाय शौचालय नसलेल्या शाळांची संख्या
अचलपूर ०९ मुले, ७ मुली, अमरावती १६ मुले, ५ मुली, अमरावती मनपा ०१ मुले, ० मुली, अंजनगाव सुर्जी १३ मुले, ३ मुली, भातकुली ०४ मुले, ०३ मुली, चांदूर बाजार १९ मुले, १०मुली, चांदूर रेल्वे ०२ मुले, ०१ मुली, चिखलदरा २६ मुले, ७ मुली, दर्यापूर ११ मुले, ०८ मुली, धामणगाव रेल्वे ०५ मुले, ०२ मुली, धारणी १४ मुले, ०८ मुली, मोर्शी ०३ मुले, ०४ मुली, नांदगाव खंडेश्वर ०६ मुले, ०५ मुली, तिवसा ०७ मुले, ०३ मुली, वरूड ११ मुले, ०८ मुलींच्या शाळांचा यात समावेश आहे.