आदिवासी रुग्णांसाठी डॉक्टरचे १४ वेळा रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:00 IST2018-05-29T00:00:13+5:302018-05-29T00:00:22+5:30
अतिदुर्गम मेळघाटात घरोघरी आरोग्यसेवा पुरवितानाच डॉक्टरने आतापर्यंत १४ वेळा रुग्णांसाठी रक्तदानही केले. डॉ. अंकुश मानकर यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे.

आदिवासी रुग्णांसाठी डॉक्टरचे १४ वेळा रक्तदान
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अतिदुर्गम मेळघाटात घरोघरी आरोग्यसेवा पुरवितानाच डॉक्टरने आतापर्यंत १४ वेळा रुग्णांसाठी रक्तदानही केले. डॉ. अंकुश मानकर यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे.
ओढग्रस्त मेळघाटात शासकीय आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करते. मेळघाटातील आदिवासी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वप्रथम उपचार दिला जातो. आवश्यकतेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येते. मात्र, आदिवासी रुग्णच बहुधा उपचार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचा अनुभव आहे. अतिदुर्गम भागात जेथे ही मानसिकता, तेथे आदिवासी रुग्णांना तातडीने रक्त देण्याची आवश्यकता भासल्यास ते पोहोचणार कधी, या प्रश्नावरून देवच आठवतात. अशा स्थितीत चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अंकुश मानकर यांनी एक-दोनदा नव्हे तब्बल १४ वेळा आदिवासी रुग्णांसाठी रक्तदान केले आहे. रुग्णांना टेंब्रुसोंडा केंद्रातून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचवून तेथे त्यांच्यासाठी रक्ताची सोय करण्याचे प्रयत्न कार्य डॉ. मानकर यांनी केले आहे. त्यांचे सहकारी डॉ. रोहन गिते, अजय अहिरकर व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही गरजेनुसार रक्तदान केले आहे.
बाळ-बाळंतीण बेपत्ता; डॉ. मानकर अमरावतीत
आदिवासी महिला रुग्णाला रक्ताची गरज होती. त्या महिलेस दोन दिवस समुपदेशन केल्यानंतर ती उपचारासाठी तयार झाली. दोन दिवसांपूर्वी तिला टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्रातून अमरावतीला रेफर करण्यात आले. तिला रक्त देण्यात आले. मात्र, उपचाराची मानसिकता नसणारी ती महिला बाळाला घेऊन गावी निघून गेली. बाळ-बाळंतीण बेपत्ता झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. त्यावेळी डॉ. मानकर यांनी तत्काळ अमरावती गाठून ती महिला कुठे व का गेली, याबाबत शहानिशा केली.