जिल्ह्यात शेतकरी उभारणार १४ उद्योग
By Admin | Updated: February 4, 2016 00:11 IST2016-02-04T00:11:26+5:302016-02-04T00:11:26+5:30
राज्यात ४५ तर जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यावसायिक आराखड्यास मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यात शेतकरी उभारणार १४ उद्योग
शासनाची हिरवी झेंडी : व्यावसायिक आराखडा मंजूर
जितेंद्र दखने अमरावती
राज्यात ४५ तर जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यावसायिक आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्याने भरारी घेतली असून लवकरच कंपन्यांच्या संचालक मंडळाकडून उद्योग उभारणीला मूर्त स्वरुप दिले जाणार आहे. आत्माच्या पुढाकाराने जिल्ह्यात सुमारे १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी करण्यात आली आहे. या कंपन्यांच्यावतीने विविध व्यावसायिक आराखडे तयार करण्यात आले होते. त्या आराखड्यास शासनाने मान्यता दिल्याने उद्योग उभारणीस चालना मिळाली आहे. मार्केट फिल्ड इंजिनिअरच्या माध्यमातून सद्यस्थितीत कंपन्यांच्या मॅपिंगचे काम सुरू आहे. महिना अखेरीस प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होऊन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कंपन्यांचे कार्यान्वयन होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या संचालक मंडळाकडून व्यवसाय आराखडा सादर केला. त्यानुसार स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पातून साडे तेरा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. कंपनीकडून कमीत कमी ४.५० लाख रुपये भांडवल त्यात असावे असा नियम आहे. १० गुंठे जागा, वीजपुरवठा अनिवार्य असून जागा भाडेतत्त्वावर अथवा कंपनीच्या मालकीची असावी. यासाठी औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उद्योगमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहे.
अशा आहेत उद्योजक कंपनी
जय मल्हार शेतकरी प्रोड्युसर कंपनी (वलगाव), ग्रीन फ्युचर प्रोड्युसर कंपनी (पुसदा), उत्तमसरा शेतमाल प्रोड्युसर कंपनी (उत्तमसरा), गणोताई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी (गणोजा देवी), महाग्राम अॅग्रो प्रोड्युसर कंपनी (नांदगाव खंडेश्वर), विश्वेश्वर शेतकरी प्रोड्युसर कंपनी (आमला वि.), कास्तकार सोया प्रक्रिया समृध्दी प्रोड्युसर कंपनी (निंभोरा बो.), विदर्भ शेतकरी शेतमाल प्रकिया अॅन्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी ली. (शिरसगाव कसबा), उत्क्रांती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी (जरुड), मेहरबाबा अॅग्रो अॅन्ड डेअरी प्रोड्युसर कंपनी ली. (अंबाडा), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अॅग्रो प्रोसेसिंग समृध्दी प्रोड्युसर कंपनी (मोझरी), अमरावती शेतकरी बियाणे उत्पादक कंपनी (चंडिकापूर), इको फ्रेंडली अॅग्रो प्रोड्युसर कंपनी (अंजनगाव सुर्जी), सातपुडा शेतकरी संत्रा अॅन्ड धान्य प्रोड्युसर कंपनी (अचलपूर)
जिल्ह्यात ७ लाख ८१ हजार हेक्टर खरीप-रबी धान्य लागवड होते. त्यामुळे परिसराचा अभ्यास करुन १२ शेतकऱ्यांना धान्य स्वच्छता व प्रतवारी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. शिरजगाव कसबा व जरुड येथील शेतकऱ्यांची संत्रा स्वच्छता प्रतवारी पॅकिंग उद्योगाचा आराखडा सादर करण्याची सूचना होती,
रवीकुमार जाधव, प्रकल्प संचालक आत्मा .